|| माणसाला माणुसकी शिकवणारी वारी ||  

अभयकुमार देशमुख, पत्रकार
Friday, 5 July 2019

एका एका टप्प्यावर अनेक प्रकारच्या व्यक्तींचा चेहरा काय सांगतो. स्वत:च्या दारात आलेल्या वारक-यांचे पाय धुवून त्यांची मनोभावे सेवा करणा-या हातांची ऊब काय असते... हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर विविध प्रश्नांचा संचय घेवून एकदा पंढरपुरचा वारकरी बनण्याचे धाडस करायला हवे...

महाराष्ट्र ही संत परंपरेची लढवय्यां शुरांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. या भूमीवर अनेक परंपरांनी आपलं स्थान बळकट केलेलं आहे. जे स्थान अढळ आणि अलौकीक असं आहे. आम्हाला मिळालं काय तर या परंपरेची देण... जी येणाऱ्या अनेक पिढ्यांची बौध्दीक बैठक अविरतपणे घडवत राहणार आहे. आषाढी वारी ही त्याच परंपरेतील एक देण म्हणावी लागेल. जी संताच्या संगतीनं असंगाचा संग नसावा याची शिकवन देत आली आहे. 

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची शिकवण वारकरी संप्रदायाने आत्मसात केली आहे. शेकडो वर्षाची ही परंपरा महाराष्ट्रासाठी आणि पर्यायानं समस्त मानव जातीसाठी भक्तीरसाचा एक असा मार्ग आहे. जिथं व्देष, मत्सर या गोष्टींचा नकळत बिमोड होवून जातो.

चित्त शुध्द तरी शत्रू मित्र होती |
वघ्रही न खाती सर्प तया ||

विष अमृत ते आघात ते हित |
दु:ख ते देईल सर्व सुख फळा ||

होतील शीतळ अग्निज्वाळा |
आवडेल जीवा जीवाचिये परी ||

सकळां अंतरी एक भाव |
तुका म्हणे कृपा केली नारायणें ||
 
तुकोबांनी या अभंगातून जगण्याचे सार सांगितले आहे. आपल्या अंतकरणात सर्वांप्रती चांगली भावणा असेल तर मिळणाऱ्या मनशांतीचे महत्व त्यांनी अभंगातून अधोरेखीत केले आहे. मनात कसलाही व्देष नसेल तर शत्रुसुध्दा मित्र होतात. यासह मनातील निर्मळता ही वाईटाचे म्हणजेच विषारी भावसुध्दा अमृतासारखे बनवते.    
 
तुकोबांची पालखी देहूतून तर ज्ञानोबांची पालखी आळंदीतून विठोबा रुखमाईच्या भेटीसाठी मार्गस्थ होते. जवळपास अडीचशे किलोमीटरहून जास्त अंतर लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत सर्व वारकरी आणि महिला वारकरी अविरतपणे चालत हे अंतर पार करतात. त्यांच्या मुखी विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा यांचे नाम असते. टाळ मृदुगांच्या गजरात वारी पंढरीच्या दिशेने जाते. तेव्हा नाना प्रकारचे अभंग वारी मार्गावरील सर्वांच्या कानी पडत असतात. 
     
वारीत दिसणाऱ्या हर एक गोष्टीचं महत्व या वारीचा मुळ उद्देश काय याची जाणीव करुन देत असतो. वारीमध्ये तुकोबा, ज्ञानोबांची पादुका वाहणारी बैलजोडी, त्याचं सारथ्य करणारे सारथी, वारीत सहभागी झालेल्या वेगवेगळ्या गावच्या दिंड्या, त्याला दिलेले नंबर त्या नंबरनुसार सर्वांची एक सांगड घातली जाते. ती सांगड घालताना योग्य ते नियोजन दोन्ही पालख्यांच्या विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाच्या मदतीनं केले जाते. त्यामुळं अखंडपणे आषाढी एकादशीपर्यंत सुरु राहणारी ही पायी वारी पंढरपुरात विठोबा रुखमाईचं दर्शन घेण्यासाठी पोहचते. आणि वारी हा विषय सर्वांच्याच कुतुहलाचा बनुन राहतो. 
     
टाळ मृदुगांच्या गजरात विठोबा, तुकोबा ज्ञानोबांच्या नावाचा जयघोष अविरतपणे पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखी असतो. संतांनी या मानव जातीला दिलं काय? तर भली मोठी अभंगाची देण दिली. हे अभंग माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी भाग पाडतात. मनात दुसऱ्याविषयी अडी असेल तर ती दुर करायला शिकवतात. बंधुभाव, प्रेम, माया, माणुसकी, अन्यायाला विरोध या सर्व शिकवणीचा मिलाप या अभंगामध्ये पहायला मिळतो. 

आपल्या मुखी संतांची भाषा बोलणारे वारकरी समस्त मानवजातीला संत परंपरेचं महत्व या वारीमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. एरव्ही सुरु असलेला त्यांचा प्रपंच वारीमध्ये अधिक प्रखरतेनं दिसून येतो. आपल्याला मिळालेली संतांची देनगी काय आहे. हे शिकायचे असेल किंवा त्याचे थोडक्यात सार समजून घ्यायचे असेल तर वारीचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. 

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई यासह अनेक संतांनी या भुमीला ज्ञानाचे भांडार दिलं आहे. त्यांचा मार्ग हा मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. हे स्पष्टपणे दिसून येते. या संत परंपरेचा या वारीच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा अमृतानुभव घेण्याची संधी निर्माण होते. अनेक मत मतांतरे या दरम्याण घडतात. पण संतांनी आपल्याला प्रेम, बंधुता, सदभाव सारख्या शिकवणीचा दिलेला ठेवा आपल्याला नाकारता येणार नाही. 
    
सद्या वारी सुरु आहे. तुकोबा, ज्ञानोबांची पालखी एक एक टप्पा पार करत पंढरीच्या विठोबाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेने पुढे पुढे जात आहे. अनेक भागातले वारकरी दिंड्या पताका घेवून या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत. रोज रात्री मुक्कामाच्या ठिकाणी भजन, किर्तनाचा मेळा भरत आहे. ज्यांच्या दारी हे वारकरी संप्रदायातील (वारकरी) लोक येत आहेत. ते प्रथेनुसार त्यांची सेवा करत आहेत. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वारकर-यांच्या मेळ्यात असणारी शब्दांची ताकद ही तुम्हाला आम्हाला वारीपासून दुर राहुन समजणार नाही. वारी एक जगण्याचं साधन आहे. हे जरी अनेकांच्या तोंडातून ऐकले असले तरी ते जगण्याचं साधन स्वत: अनुभवल्याशिवाय त्याचा अमृतानुभव कोणाच्याही लक्षात येणार नाही. 
    
परंपरा म्हणजे? काय असते. माऊलीचा जयघोष झाल्यानंतर येणारं बळ काय असते. विठ्ठल भेटीची ओढ काय असते. दाळ मृदुगांच्या गजरानं मिळणारी उर्जा कशी असते. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असलेल्या तुळशी वृंदावनातून कशी कोणती उर्जा मिळते. लहानग्या वारकऱ्यांच्या तोंडी असलेल्या अभगांची गोडी काय असते. उन, वारा, पाऊस यांची भिड माऊलींच्या जयघोषाने कशी दुर होते.

एका एका टप्प्यावर अनेक प्रकारच्या व्यक्तींचा चेहरा काय सांगतो. स्वत:च्या दारात आलेल्या वारक-यांचे पाय धुवून त्यांची मनोभावे सेवा करणा-या हातांची ऊब काय असते... हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर विविध प्रश्नांचा संचय घेवून एकदा पंढरपुरचा वारकरी बनण्याचे धाडस करायला हवे... तरच या वारीचं महत्व आपल्या लक्षात येईल. संत परंपरा काय आहे हे जाणून घेणे एवढं सोप्प नसलं तरी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करने आपल्या हातात आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं कोणाच्याही मदतीविना शोधण्यासाठी आषाढी वारीचा अमृतानुभव आपण घ्यायला हवा. जय हारी विठ्ठल...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News