मेन विल बी मेन...!

हेमंत जुवेकर
Friday, 5 July 2019

घरगुती पार्टी सुरू आहे. दोन मित्र कुठल्या तरी हॉटेलविषयी बोलाताहेत. तो दुसरा त्या हॉटेलचं नाव विचारतो, याला आठवत नाही. बायकोला ते नाव विचारायला तो हाक मारणार, इतक्‍यात मध्येच थांबतो आणि मित्रालाच विचारतो, 

घरगुती पार्टी सुरू आहे. दोन मित्र कुठल्या तरी हॉटेलविषयी बोलाताहेत. तो दुसरा त्या हॉटेलचं नाव विचारतो, याला आठवत नाही. बायकोला ते नाव विचारायला तो हाक मारणार, इतक्‍यात मध्येच थांबतो आणि मित्रालाच विचारतो, 
‘अरे ते नाही का एक फूल असतं...’ 
मित्र विचारतो, ‘लोटस?’ 
‘नाही रे, ते नाही का त्याला मस्त सुवास असतो...’
‘जास्मिन?’
‘अरे, ते नाही का ज्याला काटे असतात...’
‘रोझ?’ 
त्याच्या चेहऱ्यावर योग्य उत्तर मिळाल्याचं समाधान दिसतं. 
पण, त्यानंतर हॉटेलचं नाव सांगण्याऐवजी तो पुन्हा विचारतो; पण या वेळी बायकोला.
‘रोझ डार्लिंग, काल आपण जेवायला कुठे गेलो होतो?’
ती सांगतेही. 
आता मित्राचा चेहरा बघण्याजोगा असावा... तो दिसत नाही; पण एका गझलचा एक शेर ऐकू येतो...
‘प्यार की राह में चलना सिख, 
इश्‍ककी चाह में जलना सिख’ आणि सोबत एक वाक्‍यही, ‘मेन विल बी मेन!’
या गझलने त्या वाक्‍याने शेवट होणाऱ्या अनेक जाहिराती कदाचित कुणाकुणाला आठवायला लागल्या असतील. ज्यांना आठवल्यात त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकायलाही लागलं असेल. ज्यांच्या चेहऱ्यावर ते नाही, त्यांच्यासाठी या पुढच्या जाहिराती...
तोच तो विसरभोळा नवरा. एका ज्वेलरी शॉपमध्ये गेलाय. सेल्समन त्याला एकेक अंगठी दाखवतोय. पण तो जरा अस्वस्थ आहे. जरा आणखी भारीतली दाखवा म्हणतोय. मग तो एक छानशी अंगठी काढून सांगतो, ‘वन कॅरेट डायमंड, फर्स्ट ॲनिव्हर्सरी?’
‘टेन्थ’, अस्वस्थपणे उत्तर देऊन, तो त्याच्याहीपेक्षा भारीतली दाखवायला सांगतो.
‘वा वा काय भाग्यवान आहे तुमची बायको, ही घ्या तीन कॅरेट, खूपच छान आहे ही... कधी आहे ॲनिव्हर्सरी?’

‘काल... होती’ तो अपराधी चेहऱ्याने सांगून टाकतो.
सेल्समन त्याच्या हातात दिलेली ती आंगठी पुन्हा मागून घेतो आणि नवी उचलून म्हणतो
‘फाईव्ह कॅरेट्‌स डायमंड... प्रिन्सेस कट.’  
सेल्समनच्या हातातून अंगठी घेत तो काहीच बोलत नाही, नजरेनेच विचारतो, याने काम होईल? 

अनुभवी सेल्समन दिलासा देत नजरेनेच ‘होईल’ म्हणतो...
पुन्हा एक घरगुती पार्टी. पण एका मित्राचा अजिबात मूड नाही. काहीतरी गंभीर घडलंय. दुसरा मित्र त्याचं सांत्वन करतोय. तेवढ्यात दुरून त्या मित्राची बायको बोलावते त्याला. तो लटकलेल्या चेहऱ्याने तिकडे जातो. ते पाहून तिसरा मित्र विचारतो, ‘अरे, याला काय झालंय काय?’, तो दुसरा मित्र म्हणतो, ‘अरे त्याची बायको एका आठवड्याच्या दौऱ्यावर...’ एवढं वाक्‍य ऐकूनच त्या मित्राच्या चेहऱ्यावर ‘अच्छा, असं आहे तर...’टाईप भाव येऊ लागतात; पण तो दुसरा मित्र पुढे सांगतो, ‘ऐकून तर घे... ती जाणार होती; पण तो दौरा रद्द झालाय.’
एक सदा घाईत असणारा तरुण तळमजल्यावर लिफ्टमध्ये आहे. लिफ्ट बंद व्हायला अवकाश आहे, तेवढ्यात दुरून एक मध्यमवयीन जोडपं धावत येताना दिसतं. ती दोघंही ओरडून याला लिफ्ट थांबवायला सांगतात; पण हा न ऐकल्यासारखं करतो, कारण याला घाई आहे. लिफ्टमध्येही अठराव्या मजल्यावर पोहोचेपर्यंत याला धीर निघत नाही, असं दिसतं. दरवाजा उघडल्या उघडल्या हा वेगाने बाहेर पडणार तितक्‍यात त्याला समोर एक ‘सुंदर खाशी, सुबक ठेंगणी’ लिफ्टमघ्ये येण्यासाठी उभी असलेली दिसते. त्याबरोबर तो आपण चुकूनच या मजल्यावर आलोय, असं दाखवत पुन्हा तळमजल्याचं बटण दाबतो... तळमजल्यावर पोहोचेपर्यंत तिच्याशी काही संवाद साधण्याचा त्याचा प्रयत्न फोल ठरतो आणि तळमजल्यावर ती लिफ्टमधून निघून गेल्यावर लिफ्टमध्ये आलेलं ते मघाचं जोडपं पाहून याचं तोंड बंदच होऊन जातं...
त्या एका गझलच्या शेराचा आणि ‘मेन विल बी मेन’ या वाक्‍याच्या वापरामुळे या साऱ्या जाहिराती एकमेकांशी जोडल्या जातात. पण त्याहीपेक्षा भारी गोष्ट त्यांना जोडणारी आहे, ती म्हणजे पुरुषी मानसिकता. ‘ऑगिल्वी’ या जाहिरात कंपनीने केलेल्या या जाहिराती तशी मानसिकता बाळगणाऱ्या ग्राहकांसाठीच होत्या. त्यासाठी तशाच प्रसंगांचं नर्मविनोदी पद्धतीने सादरीकरण असल्याने पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित तरी येतंच येतं. या मालिकेतल्या साऱ्याच जाहिरातीमधून (बऱ्याच आहेत त्या) हे कुशल सादरीकरण जाणवतच. छोटे-छोटे शॉटस्‌. क्‍लोजअपस्‌ यांच्या वापरातून या छोट्या-छोट्या गोष्टी मस्तच सांगितल्यात यातून. पण यातली एक जाहिरात भारीच आहे. महत्त्वाचं म्हणजे या छोट्याशा जाहिरातीत शॉट डिव्हिजन बिल्कुलच नाही. एक फ्रेम आहे. त्यात फोनवर बोलणारी एक सुंदर मुलगी दिसतेय. ती लिफ्टमध्ये असल्याचं स्पष्ट होतंय. दोन पुरुष तिच्या दोन बाजूला एकमेकांकडे तोंड करून अदबशीरपणे उभे असल्याचं दिसतं. पण त्यांचे चेहरे नाही दिसत. लिफ्ट थांबते आणि ती मुलगी फोनवर बोलत बोलतच बाहेर पडते आणि पाठोपाठ या दोघांचे निःश्वासही बाहेर पडल्याचं जाणवतं आणि दिसतंही. कारण त्यासोबत त्यांची पोटंही बाहेर पडलेली असतात!   
या जाहिराती गमतीशीर असल्या तरी त्यांची खरी गंमत आणखीनच वेगळी आहे. ती ही की, या जाहिरातीतून ज्या प्रॉडक्‍टची जाहिरात केल्याचं दिसतं, त्यासाठी या जाहिराती मुळी नाहीतच...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News