...म्हणून रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघांमधून रोहित पवार निवडणूक लढवणार याचा निश्चित झाले आहे. कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी यांनी आज सकाळी सोशल मीडियावरून एक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई - शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघांमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी करणारा अर्जही भरला आहे. रोहित पवार नगर जिल्ह्यातून की पुणे जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असा प्रश्न अनेक दिवसांपासून सर्वांना पडलेला होता. आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघांमधून रोहित पवार निवडणूक लढवणार याचा निश्चित झाले आहे. कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी यांनी आज सकाळी सोशल मीडियावरून एक पोस्ट लिहिली आहे.

कर्जत जामखेड का? रोहित पवारांनी दिले उत्तर

याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. कर्जत जामखेड मधील तरुणांशी, महिलांशी, विद्यार्थ्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केलीच पण जेव्हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वयाच्या 21 व्या वर्षी मी व्यावसायिक क्षेत्रात आलो. तेव्हा लोकांनी प्रश्न विचारले हे वय तर जग फिरायचे असते, इतक्या लवकर जबाबदारी का?

तेव्हा माझं उत्तर होतं ते म्हणजे मला काम करायचं आहे. माझे आजोबा पद्मश्री अप्पासाहेब पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करुन शेती, सहकार, पाणी, शिक्षण अशा क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान दिलं होत. नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा मी फिरत असतो तेव्हा आजही त्यांच आणि त्यांनी केलेल्या कामांच नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. त्यांच्या पश्चात वडिल राजेंद्रदादा आणि आई सुनंदा पवार हे हि जबाबदारी प्रसिद्धीपासून दूर राहत जमिनीवर पाय ठेवून पार पाडत होते. त्याच विश्वासाने व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. आज माझ्या व्यावसायिक क्षेत्राकडे पाहिलं तर मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो ती म्हणजे या विश्वासाला आणि प्रामाणिकपणाला तडा जाईल अस काम माझ्याकडून झालं नाही आणि होणार देखील नाही.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून अर्ज दाखल करत असताना लोकांनी विचारलं व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी असताना, घराण्याचा मोठ्ठा राजकिय वारसा असताना जिल्हा परिषदच का?

तेव्हा माझं उत्तर होतं मोठ्या कुटूंबात जन्म घेणं हि नशिबाची आणि अभिमानाची गोष्ट असू शकते. आदरणीय पवार साहेबांच्या राजकारणाचा वारसा आहेच त्याहून ती मोठ्ठी “जबाबदारी" आहे. शुन्यातूनच गोष्टी समजावून घेवूनच स्वत:च कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तळागाळातील समस्यांना भिडलो. तळागाळातील समस्या समजून घेवून शिक्षण, आरोग्य, युवक, महिला, क्रिडा, बेरोजगारी अशा प्रत्येक ठिकाणी शक्य तितकं काम यशस्वीपणे करु शकलो.

आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकिय क्षेत्र ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास ते टाकतील किंबहूना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकिय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News