या अधिकाऱ्याने बनवली कमी खर्चात भातलागवड करणारी लाकडी कुरी

संदीप पंडित 
Saturday, 29 June 2019
  • पालघरमधील प्रकल्प अधिकारी सूरज पाटील यांचा अनोखा प्रयोग

विरार : जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राची खरेदी करू शकत नसल्यामुळे भात लागवडीचा जास्तीच खर्च, मजुरी आवाक्‍याबाहेर गेली आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वंदिवली गावात कमीत कमी खर्चात लाकडी कुरी (सीड सोईंग ड्रील) बनवण्यात आली आहे. याद्वारे कमी खर्चात, कमी मनुष्यबळाद्वारे भात लागवड करता येणार आहे.

कोल्हापूरमध्ये ५० वर्षांपासून वापरण्यात येणाऱ्या लाकडी कुरीचा आधार घेत बिसाचे (बोरलॉग इन्सिट्यूट ऑफ साऊथ आशिया) पालघर येथील प्रकल्प अधिकारी सूरज पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात फायदेशीर अशी कुरी बनवली आहे.

ही कुरी बनवण्यासाठी २२५ रुपयांची हार्ड कोटेड पीव्हीसी पाईप, ३० रुपयांचा काथ्या, दोन भरीव बांबू, १० फूट लाकडी नांगर जास्त दिवस टिकवण्यासाठी १५० रुपयांच्या लोखंडी पट्ट्या, १५० रुपयांचे रेडीमेड चाडे आणि एक मजूर लागला. कुरी खेचण्यासाठी कमीत कमी ताकतीचा वापर होतो; पण भात लावण्यासाठी दोन माणसे लागतात.

कुरीच्या साह्याने भात चाड्यामध्ये सोडण्यासाठी एक माणूस लागतो. या पद्धतीचा वापर करून शेतकरी पेरणीचा खर्च भरपूर प्रमाणात कमी करू शकतो आणि अवनी, चिखलनीचा तापदेखील वाचवू शकतो. उत्पन्नाच्या अधिक वाढीसाठी दोन रेषांमधून आपण कोळपणी करून जास्तीत जास्त फुटवे घेऊ शकतो. तसेच यामध्ये थोड्या फार तन व्यवस्थापनाची गरज भासते.

जी आपण कमी त्रासात करू शकतो. कोळपणी केल्यानंतर तन व्यवस्थापनावर होणारा खर्च कमी करून उत्पन्नदेखील वाढवू. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत वापरल्याने बियाण्याची कमी गरज लागते आणि खर्चदेखील कमी होतो, असे प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सांगितले.

पावसाच्या पाण्यावर शेती होणारा भाग म्हणजे कोकणातील पालघर हा आदिवासी जिल्हा. या भागात कमी खर्चात, परंतु फायदेशीर अशी ही कुरी शेतकऱ्याला खूप लाभदायक ठरणार आहे.
- सूरज प्रकाश पाटील, 
बिसा (बोरलॉग इन्सिट्यूट ऑफ साऊथ आशिया), 
पालघर प्रकल्प अधिकारी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News