‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेने करिअरला करिअरला चार चाँद लावले

शब्दांकन : काजल डांगे
Saturday, 27 July 2019

अभिनेता अभिजित खांडकेकरला खरी ओळख मिळाली ती ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे. या मालिकेनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आता मालिका करत तो मराठी चित्रपटांकडेही वळला आहे. संजय दत्त प्रॉडक्‍शन आणि ब्ल्यू मस्टॅंग क्रिएशन्स निर्मित त्याचा ‘बाबा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यानिमित्ताने अभिजित सांगतोय त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातल्या प्रवासाबद्दल....

लहानपणापासूनच कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा यांमध्ये माझा सहभाग असायचा. शिवाय माझ्या बाबांना अभिनयाची प्रचंड आवड. ते महाविद्यालयात शिकत असताना आंतरमहाविद्यालयीन नाटकांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बरीच नाटक केली. मात्र पुढे अभिनयाची आवड जोपासणं त्यांना शक्‍य झालं नाही. कदाचित त्यांच्यामधीलच अभिनयाचा गुण माझ्याकडे आला. मुळातच मला या सगळ्याची आवड होती. 

माझे बाबा बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे बीड, परभणी, नाशिक अशा विविध शहरांमध्ये माझे शिक्षण झाले. पण शाळेत असतानाही मी अभिनयाची आवड जोपासली. आठवी इयत्तेमध्ये असतानाच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी एक नाटक बसवलं होतं. त्या नाटकामध्ये मी स्वतः कामही केलं. नाशिकमध्ये मी दहावीनंतर ‘स्वप्नगंधा’ नावाच्या एका संस्थेशी जोडला गेलो. ही संस्था नाशिकमध्ये प्रायोगिक नाटक उत्तम करते आणि या संस्थेपासूनच खऱ्या अर्थाने माझ्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला सुरुवात झाली. 

वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करायला सुरुवात केली. महाविद्यालयात शिकत असताना एका लोकल न्यूज चॅनेलसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. जवळपास सहा वषें मी वृत्तनिवेदकाची नोकरी केली. कॉलेज सांभाळून मी हे काम केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो. येथे मी ‘मास कम्युनिकेशन’ हा कोर्स केला. मास कम्युनिकेशन करत असताना या कोर्सचाच एक भाग म्हणून मी जवळपास २० लघुपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि स्वतःचे चार लघुपट दिग्दर्शित केले. खरं तर हे सारं काम करताना मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

पुण्यामध्येच असताना मी आर. जे. म्हणूनही काम केलं आहे. म्हणजेच विविध क्षेत्राचा मी अनुभव घेतला. आर.जे. म्हणून काम करत असताना आता पूर्णपणे तू अभिनय क्षेत्राचा विचार कर, असं मला बाबांनी सांगितलं. या क्षेत्राकडे येण्यासाठी त्यांनी मला अधिक प्रोत्साहित केलं आणि मग मीही या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहू लागलो. नेमकं याचदरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ही स्पर्धा सुरू झाली आणि त्यामध्ये मी सहभागी झालो. खरं तर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मुळे माझा स्ट्रगलचा काळ थोडा कमी झाला. कारण विविध ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आलं. शिवाय या शोमुळे प्रेक्षकही आधीच मला ओळखू लागले होते. या शोनंतर मला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं आणि ती मालिका होती ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’. ही माझी पहिली मालिका. 

माझ्या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी अगदी डोक्‍यावर उचलून धरलं. अभिनय क्षेत्रामधील करिअरला चार चाँद लावले. या मालिकेनंतरही मला चांगली कामं, उत्तम भूमिका मिळत गेल्या. मधली काही वर्ष मी मराठी चित्रपटांकडे लक्ष केंद्रित केलं. शिवाय सूत्रसंचालक म्हणूनही मी काम केलं. माध्यम कोणतंही असो; आवडीचं काम असेल तर ते मी उत्तमरीत्या करतो. सहा वर्षांनी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेनिमित्त पुन्हा मी मालिकांकडे वळलो. या मालिकेला इतका प्रतिसाद मिळाला की गेली तीन वर्षं ही मालिका सुरू आहे. या मालिकेमधील माझी भूमिका नकारात्मक. प्रेक्षकांना आपलं हे नवं रूप पसंत पडणार का? हा प्रश्‍न माझ्यासमोर होता. पण सारं उलटंच घडलं. माझ्या गुरुनाथ या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही मी बाहेर कुठे गेलो की लोक मला गुरुनाथ या नावाने हाक मारतात. खरं तर हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. 

आपला प्रेक्षकवर्ग फार भोळा आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच चांगलं काम करण्यास नवी ऊर्जा मिळते. आता माझा ‘बाबा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचे या चित्रपटाशी नाव जोडले गेले आहे. हिंदीमधील बडे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले आहेत, याचा मला अभिमान वाटतो. वडील आणि मुलाच्या भावनिक नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामधील माझा लूक, पेहराव अगदी साधा आहे. माझ्यासाठी हा अनुभव फार छान होता. ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे चित्रीकरण करता करता मी ‘बाबा’चे चित्रीकरण केले. मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका आणि दुसरीकडे साधा-भोळा चेहरा या दोन्ही बाजू मला एकाच वेळी सांभाळाव्या लागल्या. पण हे करत असताना कुठे धावपळ किंवा कंटाळवाणं वाटलं नाही. राज आर. गुप्ता यांचं दिग्दर्शन फार उत्तम आहे. नंदिता पाटकर, दीपक डोब्रियाल या कलाकारांबरोबर काम करतानाही मला खूप मजा आली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News