प्रेमाला वय नसतं आणि पावसालाही...

श्रृती सांगोडे
Monday, 8 July 2019

जणू पहिल्यांदाच पावसात भिजतेय की काय त्यांना जरा विचित्रच वाटले, हिला झाले तरी काय? सोबत चहा घेतला नाही, एक शब्द बोलली सुद्धा नाही आणि वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी असे तरण्या पोरी सारखे पावसात भिजण्याचे खूळ हिच्या डोक्यात आले तरी कुठून?

थंड वारा, दाटुन आलेले ढग, आणि ती रम्य संध्याकाळ. वातावरण एकूण सुखद होते. अशा वेळी गरम चहाची आठवण यावी त्यात नवल ते काय. त्यांनी पण नेहेमी प्रमाणे चहाचा फर्मान सोडला आणि आराम खुर्चीत पेपर वाचत बसले. वयाची साठी ओलांडली होती, मुले आपआपल्या घरी सुखी होती. एकूण आयुष्य सुखात गेले याचे समाधान चेहेऱ्यावर नांदत होते.

ते पेपर वाचण्यात गुंग होते, एवढ्यात ती चहाचा कप घेऊन आली. तो वाफाळता कप त्यांच्या हातात देताना तिच्या ओठांवरती स्मित पसरले होते. स्वतः चहा न घेता ती बाल्कनी कडे वळली. तिथे जणू गार वाऱ्याची मैफिल सजली होती. बाल्कनी मधल्या त्या सुंदर वातावारणात ती ही मिसळून गेली. तेवढ्यात पावसाचे थेंब पडू लागले. हळू हळू पावसाचा जोर वाढू लागला. पण ती तिथेच, तशीच भिजत राहिली. त्या मोत्या सारख्या थेंबांना अंगावर झेलताना तिला अप्रतिम आनंद मिळत होता. 

जणू पहिल्यांदाच पावसात भिजतेय की काय त्यांना जरा विचित्रच वाटले, हिला झाले तरी काय? सोबत चहा घेतला नाही, एक शब्द बोलली सुद्धा नाही आणि वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी असे तरण्या पोरी सारखे पावसात भिजण्याचे खूळ हिच्या डोक्यात आले तरी कुठून? आठवणींचे चक्र त्यांच्या डोक्यात फिरू लागले, मग लवकर चहा संपवून ते ही बाल्कनीच्या दिशेने निघाले. ती भिजत होती पावसात, अलगद त्या थेंबांना झेलत, त्यांचा भरपूर आस्वाद घेत, अगदी मनसोक्त. जणू पाउस तिच्या रोमा-रोमात थिजू लागला. 

तेवढ्यात ते म्हणाले, “चहा छान झाला होता”. त्या शब्दाने तिची तंद्रा भंग झाली, त्यांच्या कडे बघून ती हसली,  आता ते ही भिजत होते तिच्या सोबत. फक्त थेंबांचा तेवढा आवाज चालू होता.

मग थोड्या वेळाने तीच बोलली “अहो, आपल्या लग्नानंतर आपण नुकतेच या घरी शिफ्ट झालो, तेव्हा पण असाच भरभरून पाउस पडलेला ना, तेव्हा असेच आपण या बाल्कनी मध्ये मनसोक्त भिजलो होतो, आठवते?.” “हम्म !! बरीच वर्ष झाली, पण वाटते जणू कालचीच गोष्ट ती. त्या दिवशी एक गुपित कळले बरे मला तुझे.” 
“हो का !! काय ते?” 
“हेच, की या उनाड पावसावर तुझे खूप प्रेम आहे...  आणि माझ्या वर ही.” आणि एक मिश्कील हास्य त्यांच्या चेहेऱ्यावर उमटले. 
ती पुन्हा हसली, आणि म्हणाली “आता ही आहे.” 
आणि ते दोघे तसेच त्या उनाड पावसात आणि त्या गोड आठवणीमध्ये भिजत राहिले,  खरच आहे, 
प्रेमाला वय नसते आणि पावसाला ही...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News