"उर्दू" वळणाच्या शब्दातून व्यक्त केलेले प्रेम

हेमंत जुवेकर
Saturday, 10 August 2019
  • सनी देओलच्या ‘सनी’ नावाच्याच सिनेमातलं ते गाणं
  • ‘एहेदे वफा’ असे नसून ‘एहद-ए-वफ़ा’ असे आहेत
  • सगळे आपापल्या व्यापा-तापात गुंतले
  • सगळीच गाणी वाईट असा शिक्का मारलाच पाहिजे

मुंबई : आदल्या दिवशी त्या गाण्यावर चर्चा सुरू होती आणि त्या गाण्यातलं दुसरं कडवं कुणालाही आठवता आठवेना... दुसऱ्याच दिवशी सारे एका मित्राच्या घरी जेवायला जाणार होतो. त्याच्या घराच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर भेटलो सगळे. कधी नव्हे ते सगळे ठरवलेल्या वेळेवरच आले होते... त्यामुळे मित्राच्या घरी थेट गेलो असतो तर जेवणाला थेट नाश्‍त्यापासूनच आले, असं त्यांना वाटलं असतं. त्यामुळे म्हटलं की थोडा टाईमपास करू आणि स्टेशनशेजारच्याच हॉटेलमध्ये शिरलो.

त्या हॉटेलच्या छतावर स्पीकर होते. गाणीही लागली होती त्यावर; पण गप्पांच्या नादात तिकडे दुर्लक्षच झालं. वेटर चहा घेऊन आल्यावर गप्पांना थोडा ब्रेक बसला नि नेमक्‍या त्याच वेळी ते गाणं लागलं
और क्‍या एहेदे वफा होते है
लोग मिलते है जुदा होते है...

सनी देओलच्या ‘सनी’ नावाच्याच सिनेमातलं ते गाणं होतं. आदल्याच दिवशी चर्चा झालेलं ते गाणं असं अकल्पित भेटल्यामुळे सगळे इतके खुश झाले की, त्या खुशीसोबत आलेल्या ओरडण्यामुळे वेटरच्या हातून चहाचे कप पडता पडता वाचले...

त्यावेळी या गाण्याचं संगीत (आरडी) तेव्हा प्रचंडच आवडून गेलं होतं आणि उर्दू वळणाच्या शब्दातून काहीतरी भारी अर्थ निघत असणार, असं वाटल्याने ते शब्दही... ते शब्द ‘एहेदे वफा’ असे नसून ‘एहद-ए-वफ़ा’ असे आहेत, हे त्यानंतर बऱ्याच वर्षांनी कळलं! त्यावेळी लावलेल्या अर्थानुसार, आपण आता कितीही प्रेमाने, आपलेपणाने अन्‌ वारंवार भेटत असलो तरी आपल्या या भेटी कमीकमी होत जाणारड पण एकमेकांबद्दलचा आपलेपणा कमी होणार नाही, असा काहीसा अर्थ त्यातून काढला होता आम्ही. (आणि आशाबाई आणि सुरेश वाडकर यांच्यापैकी कुणी ते अधिक चांगलं गायलंय याच्याबद्दल वादही घातला होता.)

त्यावेळी काढलेला अर्थ आयुष्यात खराच ठरला. सगळे आपापल्या व्यापा-तापात गुंतले.  त्या वेळी आवडलेल्या अनेक गोष्टींची, अनेक गाण्याची मोहिनी वयपरत्वे कमी अधिक झाली. कुणाची खूपच जास्त कुणाची थोडी कमी.  भेटी कमी झाल्या; पण बंद नाही झाल्या... हल्लीच त्यापैकी एक जण भेटला. तेव्हा निघालीच आठवण या गाण्याची, म्हणाला, ‘त्यावेळी काहीही आवडायचं ना आपल्याला? चक्क आनंद बक्षीही...’ त्यावेळी बोलण्याच्या ओघात लक्षात नाही आलं; ते पण नंतर ते खटकलंच.  

आपल्याला उत्तम तेच आवडतं असं सांगणं ठीकच आह; पण त्यासाठी कुणाला तरी वाईट का ठरवायचं? गजल आवडणाऱ्यांना पंकज उदास आवडूच नये काय? तो आवडतो म्हटलं की तथाकथित उच्च अभिरुचीच्या रसिकजनांच्या चेहऱ्यावर ‘हुडूत’ म्हटल्यासारखे भाव का यावेत? सुहास शिरवळकर वाचणारा वाचक कमअस्सलच असतो? आनंद बक्षीसारख्या गीतकाराने, (फक्त आठ मिनिटात गाणी लिहायचे म्हणे ते) काही गाणी पाडली असली तरी त्याची सगळीच गाणी वाईट असा शिक्का मारलाच पाहिजे? 
मित्राला त्यावेळी काही बोललो नाही; पण हे गाणं पुन्हा एकदा ऐकलं आणि हे कडवं नव्याने आवडलं  
बात निकली थी इस ज़माने की
जिसको आदत है भूल जाने की
आप क्‍यों हमसे खफ़ा होते हैं
और क्‍या एहद-ए-वफ़ा होते हैं...

कदाचित त्याचं असं झालं असेल की ऊर्दू वळणाच्या शब्दांमुळे या नज्ममधून (त्या वेळी आम्ही याला गजल समजलो होतो!) खूप मोठ्या अर्थाची अपेक्षा त्याने केली असावी. पण सगळ्याच काव्यातून, गाण्यांतून छुपे अर्थ काढून त्यातून मोठमोठ्या गोष्टी शोधण्याची सवय लागली की साधं सोप पचत नाही बहुतेक.
कब बिछड़ जाये हमसफ़र ही तो है
कब बदल जाये इक नज़र ही तो है
जान-ओ-दिल जिसपे फ़िदा होते हैं
और क्‍या एहद-ए-वफ़ा होते हैं...

बदलणं हीच कायम राहणारी गोष्ट आहे, हेच तर सांगितलंय की यातून. आपली आवड बदलते. बदलत रहाणारच वयानुसार. पण म्हणून कोणे एके काळी आवडणाऱ्या गोष्टी (आणि व्यक्ती!) आपण कालबाह्य नाहीना ठरवू शकत. त्या त्या काळात ते ते आवडलेलं असतं नि त्यांची एक खास जागाही तयार झालेली असते मनात. त्या जागेची किंमत करू नये कधी. कारण त्या छोट्याशा जागेतही खूप काही साठून राहिलेलं असतं... 
कुणाला त्यातून असा एक प्रसंग आठवू शकतो; तर कुणाला दिसू शकतो एक मोठ्ठा कालखंड...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News