शिक्षकांच्या जागा न भरल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

जितेंद्र मैड
Thursday, 11 July 2019
  • पुणे महापालिकेच्या शाळांमधील १९० हंगामी शिक्षकांची भरती प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार प्रा. सागर शेडगे यांनी केली आहे.
  • शिक्षक भरती न झाल्यामुळे एका शिक्षिकेला ८० हून अधिक विद्यार्थी सांभाळण्याची वेळ आली आहे.

पौडरस्ता - पुणे महापालिकेच्या शाळांमधील १९० हंगामी शिक्षकांची भरती प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार प्रा. सागर शेडगे यांनी केली आहे. शाळा सुरू होऊन महिना झाला तरी याबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी एक शिक्षक ८० विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ही अक्षम्य बाब आहे, असेही ते म्हणाले

याबाबत माहिती देताना प्रा. शेडगे म्हणाले, महापालिकेच्या शाळा १७ जूनला सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी, शिक्षक भरती न झाल्यामुळे एका शिक्षिकेला ८० हून अधिक विद्यार्थी सांभाळण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होण्याच्या दिवशी सर्व शिक्षक पट का भरला जात नाही, मंडळ गरिबांच्या शिक्षणाबद्दल किती गंभीर आहे, हे त्यांच्या कृतीवरून वारंवार दिसून आले आहे.

आत्ताच्या हंगामी शिक्षक भरतीमधील दिरंगाईसुद्धा अक्षम्य बाब आहे, तर सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड म्हणाले, हंगामी शिक्षकांची मानधनात वाढ करावी, यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षात काही शिक्षकांनी काम बंद आंदोलन केले होते. तेव्हा कामावर रुजू होण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झालेली नाही. रुजू होण्यापूर्वी दहा हजार रुपये अनामत म्हणून भरलेली रक्कम अद्यापही अनेक शिक्षकांना परत करण्यात आलेली नाही.

नोकरीवर नाही घेतले त्याबद्दल आभार; परंतु आमची अनामत रक्कम तरी द्या, अशी विनंती काही शिक्षकांनी शिक्षण मंडळाकडे केली आहे. मानधन कमी देऊन शिक्षक भरती केली जात असल्याने गुणवंत शिक्षक मिळत नाहीत. त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. महापालिकेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून कोणताही लोकप्रतिनिधी वा अधिकारी पद्धतशीर प्रयत्न करताना दिसत नाही, असेही ते म्हणाले

शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण म्हणाले, शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण होत असतानादेखील विनाशिक्षक शाळा चालू ठेवण्याची शिक्षण मंडळाची परंपरा २०१४ पासूनची आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेली पाच वर्षे शिक्षक नसल्यामुळे गरीब, कष्टकरी, दलित उपेक्षित विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण मंडळाकडे काय योजना आहेत, ते त्यांनी सांगावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News