#loksabha2019 - महाराष्ट्रात इथे असेल काटेकी टक्कर

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Saturday, 23 March 2019

पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या, उमेदवार निश्चित झाले. आता शक्ती प्रदर्शने, प्रचार, सभांचा पाऊस पडेल.

महाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या, उमेदवार निश्चित झाले. आता शक्ती प्रदर्शने, प्रचार, सभांचा पाऊस पडेल. अशाच काही 'कडक' मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा...

नितीन गडकरी विरूद्ध नाना पटोले (नागपूर)
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि भाजपमधून नाराज होऊन बाहेर पडलेले काँग्रेसचे लोकसभेसाठीचे उमेदवार नाना पटोले यांच्यात नागपूरमध्ये कडवी लढत होणार आहे. गडकरी हे नागपूरचे विद्यमान खासदार आहेत. पटोले यांनी भाजपमधून बाहेर पडताना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला होता. गडकरी हा विदर्भातील 'पॉवरफुल' चेहरा असून, ते सर्वसमावेशक आहेत, तर पटोले यांना राहुल गांधींनी उमेदवारी दिल्याने तेथील काँग्रेसचे कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. 

पूनम महाजन विरूद्ध प्रिया दत्त (उत्तर-मध्य मुंबई)
मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेची जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई! यंदा भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून प्रिया दत्त या निवडणूक लढतील. पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. दोनवेळा खासदारकी भूषविलेल्या प्रिया दत्त यांना 2014 च्या लोकसभेत पूनम महाजन यांनी पराभूत केले होते. आता पुन्हा या दोघींमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. 

डॉ. सुजय विखे-पाटील विरूद्ध संग्राम जगताप (दक्षिण नगर)
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा ठरलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण नगर! येथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉ. सुजय विखेंना येथील उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे येथे विखे विरूद्ध जगताप संघर्षाच्या स्वरूपात विखे विरूद्ध पवार असाच संघर्ष बघायला मिळेल. 

शिवाजीराव आढळराव पाटील विरूद्ध डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)
शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीनवेळा खासदारकीवर आपली मोहोर उमटवलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरूद्ध या निवडणुकीत आव्हान आहे ते राष्ट्रावादीच्या डॉ. अमोल कोल्हेंचे. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कोल्हे यांचे आढळरावांना तगडे आव्हान आहे. त्यामुळे तीनवेळा खासदार असण्याची परंपरा मोडते की कायम राहते, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

अनंत गिते विरूद्ध सुनील तटकरे (रायगड)
रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गिते यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांचे आव्हान असेल. माजी जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांची या विभागात चांगली छाप असून, गितेंचेही रायगडमध्ये वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे रायगडमधील ही लढत चुरशीची होणार असे दिसते.

हेमंत गोडसे विरूद्ध समीर भुजबळ (नाशिक)
शिवसेनेच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच या निवडणुकीतही नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर तगडे आव्हान असेल ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे सुपुत्र समीर भुजबळ यांचे! समीर भुजबळ यांनी 2009 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यामुळे आता नाशिककर कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News