वाशिममध्ये रक्तदात्यांच्या हातीच १९६ रुग्णांचे जीवन!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • थॅलेसिमीया, सिकलसेल आजारामध्ये रुग्णांच्या शरीरात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रक्त निर्मिती होत नाही.

वाशीम - थॅलेसिमीया, सिकलसेल आजारामध्ये रुग्णांच्या शरीरात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रक्त निर्मिती होत नाही. त्यामुळे या रुग्णांचे संपूर्ण जीवन रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानावरच अवलंबून असते. किंबहून अशा रुग्णांना रक्तपुरवठा झाला नाही, मृत्यू देखील ओढावू शकतो. जिल्ह्यात अशाच १९६ रुग्णांचे जीवन पूर्णतः रक्तदात्यांनी दान दिलेल्या रक्तावरच सुरू आहे.
"रक्त दान, श्रेष्ठ दान'' ही म्हण समाजात रूढ आहे.

कारण, रक्तदानामुळे आपण एखाद्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून जीवनाच्या दारात उभे करू शकतो. ही बाब केवळ रक्तदानामुळेच शक्‍य आहे. रक्ताची गरज मुख्यतः अपघातातील गंभीर जखमी रुग्ण किंवा ज्यांच्या शरीरात नैसर्गीकरित्या रक्त निर्मिती होत नाही, अशा थॅलेसिमीया व सिकलसेल ग्रस्त रुग्णांना असते. त्यातही अपघातातील गंभीर जखमींना जास्त रक्तस्त्राव झाला तरच रक्ताची गरज पडते. मात्र, थॅलेसिमीया व सिकलसेल ग्रस्तांना संपूर्ण जीवनच रक्तदात्यांनी दिलेल्या रक्तावर अवलंबून असते. वाशीम जिल्ह्यात ६६ थॅलेसिमीयाग्रस्त व १३० सिकलसेलग्रस्त असे रुग्ण आहेत. या १९६ रुग्णांचे जीवन केवळ रुक्तदात्यांनी दिलेल्या रक्तावरच अवलंबून आहे. त्यामुळे समाजातील या घटकांसाठी नियमीत रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यात अपघाताचे प्रमाण अधिक
मुख्यतः उन्हाळ्याच्या दिवसांत रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक असते. रस्ते अपघात झाल्यास वाहनचालकाच्या डोक्‍याला किंवा शरीरावर इतरत्र गंभीर इजा होऊन जास्त रक्तस्त्राव होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत रक्त पेढीकडे रक्ताची अधिक मागणी असते. मात्र, मागणीच्या तुलनेत रक्तदानाअभावी पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात. 

रक्तदान जनजागृतीची गरज
रक्तदानाबाबत नागरिकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत. यामध्ये रक्तदानामुळे अशक्तपणा येणे, रक्तनिर्मिती न होणे आदींचा समावेश आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील हे गैरसमज जनजागृतीद्वारे दूर होणे गरजेचे आहे. तरच रक्तदान करणारे उत्स्फूर्तपणे समोर येऊ शकतील.

अपघातातील गंभीर जखमी किंवा समाजातील थॅलेसिमीया, सिकलसेल ग्रस्तांना नियमीत रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना रक्त न मिळाल्यास मृत्यू देखील ओढावतो. त्यामुळे समाजातील सुदृढ नागरिकांनी नियमीत रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

- डॉ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News