जटमुक्ती 

यिनबझ टीम
Sunday, 27 January 2019

मुंबईसारख्या महानगरीत वयाच्या सोळाव्या वर्षी डोईतील केसात निर्माण झालेली जट अंधश्रद्धेपायी पुढील सोळा वर्षें शारीरिक, मानसिक आणि भावनिक यातना सोसत बाळगणारी पाठमोरी स्त्री आणि त्या अंधश्रद्धेचे साडेसहा फूट लांबीचे बिभत्स रूप मुळासकट उपटून टाकणा-या अंनिसच्या पुणे जिल्हा शाखेच्या धडाडीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव!

मुंबईसारख्या महानगरीत वयाच्या सोळाव्या वर्षी डोईतील केसात निर्माण झालेली जट अंधश्रद्धेपायी पुढील सोळा वर्षें शारीरिक, मानसिक आणि भावनिक यातना सोसत बाळगणारी पाठमोरी स्त्री आणि त्या अंधश्रद्धेचे साडेसहा फूट लांबीचे बिभत्स रूप मुळासकट उपटून टाकणा-या अंनिसच्या पुणे जिल्हा शाखेच्या धडाडीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव!

मुंबईतल्या उपनगरात अंनिसच्या नंदिनी जाधव जटा निर्मूलन करण्यासाठी येणार आहेत हा निरोप रात्री मिळाला आणि नुकत्याच जटामुक्तीची शंभरी केलेल्या नंदिनीताईंना भेटायला जायचं ठरवलं. १०१व्या जटाधारित मुलीची जटमुक्तता करायला पुण्याहून खास आलेल्या नंदिनीताई, अंनिसचे कार्यकर्ते, मुलीचे पालक आणि ज्यांच्या पाठपुराव्यामुळे जट काढायला तयार झाले ते शिक्षक व संस्थाचालक, मिडियातले लोक आणि या सर्वांपुढे साडेसहाफुट लांबीची जट गेली सोळा वर्ष वागवणारी ती ३०-३२ वर्षांची मुलगी. मुंबईतली आल्हाददायक दुपार असूनही अस्वस्थता आसमंतात भरुन राहिलेली. 

सोळा वर्षांपूर्वी नववीत असताना जट आलेली ही मुलगी समाजाच्या भितीने ही जट वागवत समाजापासून अलिप्त आयुष्य जगत होती. शिकण्या खेळण्याच्या वयात शाळा सोडून घरी बसली होती. तब्बल सोळा वर्ष सामाजिक वनवासात होती. अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी केलेल्या जटामुक्तीच्या कार्याची माहिती या मुलीच्या शाळेतील शिक्षकांना कळली. त्यांनी नंदिनीताईंना संपर्क केला आणि शिक्षक व संस्थाचालकांच्या मदतीने मुलीची आणि पालकांची जटमुक्तीसाठी मानसिक तयारी करुन घेतली.

गुरवारी २४ जानेवारीला नंदिनीताईंनी या सोळा वर्षांच्या जटेपासून या मुलीला मुक्त केलं आणि आजपासून तिला एक नविन ओळख मिळवून दिली. जट काढल्यावर हलकं हलकं वाटतय ही या जटमुक्त मुलीची प्रतिक्रियाही, तिने सोळा वर्ष सोसलेल्या ओझ्यातून मोकळं झाल्याची भावना होती. जटमुक्त झाल्यावर त्या मुलीच्या चेह-यावरचा आनंद हा खरचं सुंदर जगाचं स्वप्न पाहणा-या सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा होता.

नंदिनीताईंनी अंनिसच्या माध्यमातून आतापर्यंत १०१ जणींना जटमुक्त केलं आहे आणि अशा अनेक नंदिनीताई या जटमुक्तीच्या कामात आहेत. आजच्या प्रगत जगात, समानतेच्या संविधानिक युगात अजूनही अशा प्रकारचं काम करायला लागतंय हीच खरी व्यथित करणारी बाब आहे. अंधश्रध्दा आणि परंपरांच्या जोखडाखाली असणारा, सामाजिक बंधनांखाली असणारा समाज बदलण्याचं काम सातत्याने जाणीवपूर्वक करण्याची किती गरज आहे हेच यावरुन दिसून येतय.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News