आजीचे नातवंडांना पत्र  

आनंद घायवट, कसारा
Wednesday, 27 February 2019

आज अचानक घरातून बाहेर बोलवून पोस्टमन काकांनी मला पत्र हातात दिले पण पत्रावरील आजीचे नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला,पाहतो तर चक्क आजीने आज आम्हांला पत्र पाठवले होते.

प्रिय मिलिंद, आनंद, शैलेश
तुम्हांला लाख लाख आशिर्वाद.

आज अचानक घरातून बाहेर बोलवून पोस्टमन काकांनी मला पत्र हातात दिले पण पत्रावरील आजीचे नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला,पाहतो तर चक्क आजीने आज आम्हांला पत्र पाठवले होते. खरे तर बाळांनो मुळात मला तुमच्या सहवासात कधी पत्र लिहायची गरजच भासली नाही परंतू मनातील भावना प्रकट करण्याचा मार्ग म्हणून मी पत्रलेखन करण्याचा निर्णय घेतला.भलेही माझे पत्र पाहून आज तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसला असला तरी मला तुमच्या सहवासात आलेले अनुभव तुमच्या समक्ष मांडते.
         
आजपासून २३ वर्षापूर्वी तुमच्या वडीलांचे निधन  झाले,अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा तो भास होता कारण घरी अठराविश्व दारिद्रय पाचवीला पुजलेले,अचानक मुलाच्या जाण्याने पदरात सुनेसह तीन नातवंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी अन् पाठीमागे कोणाचाही आधार नाही, कशी वाट काढावी यातून समजायला देखील मार्ग नव्हता,परंतू फक्त दूःख धरून बसलं तर काहीच मार्ग निघणार नाही या एका विचाराने सुनेसह आयुष्याची नौका एका सुकर मार्गावर नेवून व्यवस्थित सांभाळायची या प्रेरणेने अक्षरशः सगळी दूःख मागं सारून नातवंडाचे उज्वल भविष्य घडविण्या साठी जीवनप्रवास चालू केला.
        
नातवंडांना परिस्थितीची किंचितही झळ लागू न देता परिस्थितीवर मात करत उच्चशिक्षित बनवले,व्यवस्थित मार्गाला देखील लावले,वाममार्गाला कुणी जाणार नाही, व्यसनाच्या विळख्यात कुणी सापडणार नाही याची काळजी घेतली,कारण तुमचा बाप म्हणजे माझा मुलगा हा व्यसनाच्या मोहपाशात अडकून वयाच्या तिसाव्या वर्षीच हे जग सोडून  माझ्यासह तुम्हांलाही कायमस्वरूपी पोरके करून गेला,परंतू तो गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा दुःखावर मात करत तुम्हां तीघा भावंडांना मी नातू ऐवजी मुलगाच समजून व्यवस्थित वाटचालीत,संस्कारात घडवू लागले,अन् तुम्हांला घडवतांना ज्या बाबी मी माझ्याकडून माझ्या मुलापर्यंत पोहचवू शकले नव्हते त्या सर्व बाबी तुमच्यात रूजवण्यात अगदी बारकाईने लक्ष दिले.त्याच मेहनतीचे फळ मला माझे तीनही नातू उच्चशिक्षित तसेच व्यवस्थित हुद्द्यावर कार्यरत असल्याने साध्य झाल्याचे समाधान लाभले.
            
मुळात ही भावना पत्र लिहितांना यत्किंचितही मनात डोकावलेली नव्हती ,खरे तर दुनियेची भावभरात पाहता माझे नातू आज उच्चशिक्षित असल्याकारणाने तसेच विवाहित असल्याने मलाही एखाद्या अनाथआश्रम अथवा वृद्धाश्रमात रवानगी करतील की काय ही चिंता भेडसावत असायची,कारण या बद्दल पेपरला वाचलेले,कुणाच्यातरी तोंडून ऐकलेले असायचे
आणि अशा दुःखद घटना वाचून मन अस्ताव्यस्त व्हायचे,जर नातवंडांनी आपल्याला असे दिवस दाखवले तर आपण यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य जाळल्याचा काय फायदा झाला?आणि मन उद्विग्न व्हायचे.
        
 परंतू सत्य परिस्थिती अनुभवतांना न भुतो न भविष्यती असा सांभाळ माझा नातवंडांसह नातसुनांकडून होतांना नक्कीच ही कोण्या जन्माची पूण्याईच असावी.याची जाणीव करून जातो,कारण २३ वर्षापूर्वी मुलगा सोडून गेला असतांनाही तुम्हां लोकांना समज आल्यानंतर तसे तुम्ही कधी जाणवू दिले नाही,या पुण्याईनेच आज हा माझा जन्म सार्थकी लागल्याचे समाधान चेहऱ्यावर लाभले. खरेतर हीच तुमची गुणगान गाथा तुमच्या समोर प्रत्यक्ष मांडतांना जीवाची घालमेल उडाली असती तीच आज पत्राद्वारे मांडतांना मनातील भावनांना वाट मोकळी करून देवू शकले.

                                                                              तुमचीच आजी,
                                                                                देवकाबाई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News