विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाकडे पाठ राज्यात चार वर्षात घटल्या एक लाख जागा, यावर्षी वीस हजार जागांची घट

विवेक मेतकर
Tuesday, 18 June 2019
  • विद्यार्थ्यांनी आता तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे.
  • दरवर्षी सुमारे २५ हजार जागा कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
  • तुलनेत सध्या इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावलेली दिसत आहे.

अकोलाः नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध होत नसल्याने आणि कंपन्यांमध्ये मिळणारे तुटपुंजे वेतन यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी आता तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी २०१५-१६ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यातील तंत्रशिक्षणाच्या तब्बल १ लाख १ हजार ५७४ जागा घटल्या आहेत. दरवर्षी सुमारे २५ हजार जागा कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कल तंत्रशिक्षणाकडे वाढलेला होता. त्या तुलनेत सध्या इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावलेली दिसत आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देत असून अकरावी-बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक दिसत आहेत.

दरम्यान, अकोला येथील नामवंत लरातो वाणिज्य महाविद्यालयात फेरफटका मारला असता विद्यार्थ्यांचा ओढा वाणिज्य शाखेकडे असल्याचे पाहावयास मिळाले. याबाबीला प्राचार्य श्री प्रभू चापके यांनीही दुजोरा दिला. यासंदर्भात काही पालकांशी संवाद साधला असता, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे भविष्यात बॅंकिंग क्षेत्राला चांगले दिवस आहेत. शिवाय स्पर्धा परीक्षेचा मार्गही वाणिज्य शाखेतून जातो. 

इंजिनिअरिंग केल्यानंतरही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतातच. त्यामुळे सुरुवातीपासूनच वाणिज्य शाखा निवडल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यावरूनही अभियांत्रिकीकडे असलेला कल घटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नव्हे तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठीच्या मान्यताप्राप्त संस्था, प्रवेश क्षमता आदी तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या तपशिलानुसार पाच वर्षांत जागा घटल्याचे स्पष्ट होत आहे. २०१२-१३ ते २०१९-२० या सात वर्षांत सर्वाधिक जागा २०१५-१६ या वर्षी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मात्र जागा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार ८५ जागा कमी झाल्या आहेत.

कमी झालेल्या जागांची माहिती केवळ एआयसीटीईची मान्यता असलेल्या संस्थांशी संबंधित आहे. त्यात देशातील आयआयटी, एनआयटी अशा केंद्रीय संस्था, अभिमत विद्यापीठे आणि काही विद्यापीठांतील अभ्यासक्रमांच्या जागांची माहिती समाविष्ट नाही. पूर्वी देशात थोडय़ाच आयआयटी, एनआयटीची संख्या मर्यादित होती. मात्र, अलीकडे या संस्थांची संख्या वाढल्याने विद्यार्थी तिकडे प्रवेश घेऊ लागले. त्याचा फटका खासगी संस्थांना बसला. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढतच गेली. आणखी काही जागा कमी होण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सर्वत्र सारखीच स्थिती..
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये देशभरातील १० हजार ३२९ संस्थांमध्ये ३८ लाख ३६ हजार १८१ जागा उपलब्ध होत्या, तर २०१९-२० साठी १० हजार ७७८ संस्थांमध्ये मिळून ३२ लाख ५२ हजार ८२१ जागा उपलब्ध आहेत. याचाच अर्थ ५ लाख ८३ हजार ३६० जागा कमी झाल्या. कमी झालेल्या जागांमध्ये एकट्या महाराष्ट्रातून १ लाख १ हजार ५७४ जागा कमी झाल्या आहेत.

राज्यातील संस्था आणि प्रवेश क्षमतेची स्थिती –
२०१५-१६ - एकूण संस्था – १,५४२ प्रवेश क्षमता – ४, ८१, ६७३
२०१८-१९- एकूण संस्था – १ ५५७ -प्रवेश क्षमता – ४,००, १८४
२०१९-२० - एकूण संस्था – १,५५६ प्रवेश क्षमता – ३,८०,०९९

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News