बिबट्याचा तरुणावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • जानेफळ परिसरात दोन दिवसातील दुसरी घटना
  • शेतकरी वर्ग भयभीत
  • वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज

जानेफळ : कुटुंबासह शेतात राहणाऱ्या तरुणावर रात्री बिबट्याने हल्ला चढवित गंभीर जखमी केल्याची घटना वडाळी तालुका मेहकर येथे शुक्रवार ७ जून रोजी रात्री घडली आहे. गेल्या दोन दिवसात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडली असून यामुळे जानेफळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वडाळी ता. मेहकर येथील दगडू पांडुरंग ढंगारे वय २२ वर्ष हे आपल्या पत्नी, मुले व आई-वडिलांसह वडाळी शिवारात असलेल्या आपल्या शेतात राहत असताना शुक्रवार दि.७ जून २०१९ रोजी रात्री ९ वाजेदरम्यान त्यांना बाजूलाच असलेल्या आपल्या गुरांच्या गोठ्यात बैल ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे त्यांनी लगेच गोठ्यात धाव घेतली असता गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घेत पाठीवर चावा घेतला तसेच पोटावर छातीला कमरेवर व मांडीवर पंजाची नखे मारून गंभीर रित्या जखमी केले आहे.

रात्री वादळी पावसामुळे कुठेच नेण्याची संधी मिळाली नसल्याने ८ जुन रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप अंभोरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मेहकर येथे रेफर केले आहे.

गत दोन दिवसापूर्वीच ५ जुन रोजी पार्डी शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या पार्डी तालुका मेहकर येथील लक्ष्मण सहदेव शिंदे या पंधरा वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला चढविला होता परंतु त्यांच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरड केल्याने बिबट्याच्या तावडीतून तो बचावला होता.

सध्या मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोमात सुरू झालेली असतांना बिबट्याने मात्र जानेफळ परिसरात धुमाकूळ माजविल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News