"स्क्रीन टाइम"मध्ये अडकलेल्या तरुणांनो जाणून घ्या उपाय!

विशाल पाटील
Saturday, 8 June 2019

अहो, बघाना आपलं इवलसं मूल स्मार्ट फोन चालवतंय... येथपासून ते... मोबाइल शिवाय दिवस रात्र सरेना, त्याच्या भवितव्याची भितीच वाटतेय... यापर्यंतचा प्रवास आज लाखो घरांतून वेगाने सुरू आहे. कॉम्प्युटरायझेशनचा जमान्यात स्मार्ट मोबाइलमुळे हातात इंटरनेट आणि स्क्रीन दोन्हीही आले अन्‌ नकळत स्क्रीन, मोबाइल, टीव्हीच्या आधीन झालो. ही समस्या गंभीरपणे घ्यायला हवी. पबजी खेळताना हृदयविकाराचा झटका आला, नवीन मोबाइल न दिल्याने शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या, गेम खेळण्यास मोबाइल न दिल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या... अशा बातमी वाचतो अन्‌ आपला थरकाप उडतो.

अहो, बघाना आपलं इवलसं मूल स्मार्ट फोन चालवतंय... येथपासून ते... मोबाइल शिवाय दिवस रात्र सरेना, त्याच्या भवितव्याची भितीच वाटतेय... यापर्यंतचा प्रवास आज लाखो घरांतून वेगाने सुरू आहे. कॉम्प्युटरायझेशनचा जमान्यात स्मार्ट मोबाइलमुळे हातात इंटरनेट आणि स्क्रीन दोन्हीही आले अन्‌ नकळत स्क्रीन, मोबाइल, टीव्हीच्या आधीन झालो. ही समस्या गंभीरपणे घ्यायला हवी. पबजी खेळताना हृदयविकाराचा झटका आला, नवीन मोबाइल न दिल्याने शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या, गेम खेळण्यास मोबाइल न दिल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या... अशा बातमी वाचतो अन्‌ आपला थरकाप उडतो. म्हणून आताच सावधान व्हा... स्क्रीन टाईम वाढतो आहे. 
डॉ. नितीन रोकडे, मनोविकारतज्ञ, सातारा. 

हे सर्व कसं थांबवता येईल? याच उत्तर देण्याआधी व्यसन लागते म्हणजे काय हे समजून घेवू. सर्वसामान्यतः व्यसन म्हणजे वाईट सवय. व्यसन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर किंवा त्या गोष्टीची अतिरिक्त प्रमाणात लागलेली सवय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर दिनक्रमातील आवश्‍यक गोष्टी आणि जबाबदारीची कामे टाळून आपण मुद्दाम एखादी गोष्ट करायला लागलो, तीच्यातच रमायला लागलो तर त्या गोष्टीचे आपल्याला व्यसन लागले आहे, असे म्हणता येईल (उदा. हातातील कामं सोडून, अभ्यास सोडून टिव्ही, व्हॉटसअप, फेसबूक पाहत राहणे, गेम खेळणे). अशा व्यक्तीच्या मनात सतत त्या गोष्टी बद्दलचे विचार चालू असतात.

या गोष्टीमध्ये ते इतके गुंतुन जातात की ती गोष्ट करता न आल्यास त्यांची चिडचिड होते. ज्यांच्या मुळे त्यांना ती गोष्ट करता येत नाही, त्या व्यक्ती त्यांना शत्रू वाटू लागतात. कोणत्याही मार्गाने ती गोष्ट करायचीच, असा अट्टाहास सुरू होतो. टिव्ही, मोबाइल गेम, यातून एक प्रकारच्या आनंद मिळतो. मनाला मिळणारा हा आनंद कायम स्वरुपी नसतो. जितकावेळ वापर तितकाच वेळ तो आनंद असतो. हा आनंद आणि त्यातून मनाला मिळणारा हलकेपणा हवाहवासा वाटू  लागतो. त्यासाठी त्या गोष्टींचा अतिरिक्त वापर सुरु होतो, इतर आवश्‍यक गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागते आणि व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरू होते. 

मुलांना स्क्रीनचे व्यसन लागले आहे तर त्यात दोष फक्त मुलांचा आहे का, याचे उत्तर नाही असेच असेल. कारण जागतिकीकरणाचे वारे, बदलती जीवनशैली, कॉम्प्युटरायझेशनचा जमाना, वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यातून येणारा ताणतणाव. हा ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यातून मुक्तता मिळवण्यासाठी पटकन आनंद देणाऱ्या गोष्टींचा शोध सुरु झाला. तो आनंद टीव्ही, मोबाइल, इंटरनेटमधून मिळू लागला. या सर्व गोष्टी सहज उपलब्धही होवु लागल्या आहेत. स्मार्ट मोबाइलमुळे हातात इंटरनेट आणि स्क्रीन दोन्हीही आले, त्याचा वैयक्तिक वापरही शक्‍य झाला, परिणामी वापराचा कालावधीही आपोआप वाढला आणि आपण सगळेच नकळत स्क्रीन, मोबाइल, टीव्हीच्या आधीन झालो.
 
मुलांच्या बाबतीत ही समस्या थोडी गंभीरपणे घ्यायला हवी. आजची किशोरावस्थेतील मुलं आणि विशीतील तरुण- तरुणी जन्माला आले तेच मुळी टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या आधुनिक जमान्यात. मुलांचे कॉम्प्युटर ज्ञान, मोबाइल हाताळण्यातील तरबेजपणा हा पालकांसाठी कौतुकाचा विषय असतो. सहज उपलब्धता आणि कौतुक यामुळे या गोष्टी वापरायलाच हव्यात, त्याशिवाय आपल्याला मागासलेपणा येईल, आपले कौतुक होणार नाही, असे मुलांना वाटू लागते; परंतु त्या किती वापरल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे वापरल्या पाहिजेत याचे बंधन त्यांना समजत नाही. मुळात पालकांमध्येही ते फारसे स्पष्ट नसते. 

इंटरनेटच्या माध्यमातून बहूविध प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते. पण, ती फक्त माहिती असते ज्ञान नसते. मुल एखादा प्रकल्प करण्यासाठी स्वतःहुन काही प्रयत्न करण्याऐवजी गुगलची मदत घेवू लागले तर त्याला पाहिजे ती माहिती मिळेल. पण, त्यात त्याच्या कल्पनाशक्तीचा वापर शुन्य असतो. परिणामी त्याचा विकास खुंटतो. या सगळ्यात नव्याने समोर येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या आभासी जगात मुलं एकटी पडु लागली आहेत, मैदानी खेळ टाळु लागली आहेत, ते आभासी जग त्यांना खरे वाटु लागते, त्यामुळे मुलं उदासिनतेचे बळी पडु लागले आहेत, वास्तवापेक्षा जास्त ते सोशल मीडियावर व्यक्त होतात, त्यातुन काही गैरप्रकार घडले की पालक जागे होतात. आणि मोबाइल बंद, टीव्ही बंद, नो इंटरनेट ऍक्‍सेस अशा टोकाच्या भुमिका घेतल्या जातात. पण आजच्या या तंत्रयुगात आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियापासून मुलांना फार काळ दूर ठेवू शकत नाही.
 
व्यसनाधिनता फक्त औषधांनी बरी होऊ शकत नाही. व्यसन ही एक शारीरिक, मानसिक व्याधी आहे व या व्याधीपासून मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक उपचार केले पाहिजेत. व्यसनाधिन व्यक्तीच्या कुटूंबियांनी, मित्रांनी मनोविकारतज्ञ, मानसोपचारतज्ञ, समाजसेवक आदी तज्ञ मंडळींची मदत एकत्रितरित्या उपलब्ध करुन दिल्याखेरीज व्यसनी व्यक्तीचा सर्वांगिण उपचार होवू शकत नाही. मानसोपचाराद्वारे मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेतल्या जातात, त्यांना त्या समस्या सोडविण्याचे आणि प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र शिकवीले जाते, त्यांच्या वर्तनात आणि सवयींमध्ये बदल घडविले जातात, स्वभावातील त्रुटी (चिंताखोरवृत्ती, भित्रेपणा) आणि मनोविग्रह दूर करण्यास शिकविले जाते. 

मुलांशी साधा संवाद 
या गोष्टींच्या आहारी जावून आपली मुले व्यसनाधीन होवू नये, असे वाटत असेल तर पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरुवातीपासूनच मुलांना याचे फायदे तोटे, वापराचे नियम सांगत राहणे गरजेचे आहे. मर्यादित वापर, जबाबदारीची जाणीव, वेळेचा अपव्यय, अनावश्‍यक गोष्टींसाठी वापर न करणे, यासाठी मुलांशी संवाद साधणे आवश्‍यक आहे. मुलाच्या हातात मोबाइल देताना त्याला अँड्रॉइड फोनची गरज आहे का याचा विचार पालकांनीच करायला हवा. 

पालकांनाही हवेत बंधने 
मुलांच्या बाबतीत हे धोके टाळायचे असतील तर पालकांनी स्वतःसुध्दा मोबाइल, टीव्हीच्या वापरावर बंधने घालुन घ्यायला हवीत. जाता जाता पालकांसाठी एक महत्वाचा मंत्र म्हणजे ज्या गोष्टी मुलांनी करु नयेत असे तुम्हाला वाटते त्या गोष्टी तुम्ही स्वतः करु नका. त्यासाठीच्या मर्यादा, नियम तुम्ही ठरवा आणि ते पाळा, कारण तुमच्या मुलांचे आदर्श तुम्हीच आहात. 

इंटरनेट/ स्क्रीन ऍडिक्‍शनचे धोके 
1. या व्यसनाच्या आहारी गेलेली मुले भवितव्यात उदासिनता, ताणतणाव आणि गंभीर मानसिक आजाराचे बळी ठरु शकतात. 
2. ही मुलं भावनिक दृष्ट्या स्वस्थ नसतात. आक्रमकता, वर्तन समस्या, अभ्यासातील अधोगती अशा अनेक समस्या या व्यसनापायी उद्‌भवतात. 
3. सततच्या मोबाइल आणि इंटरनेट वापराने शारीरिक आरोग्य देखील ढासळते. भूक न लागणे, पचनसंस्था बिघडणे, झोप नीट न लागणे, लठ्ठपणा, डोळ्यांचे विविध विकार, बोटांच्या वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे कार्पेल टनेल सिंड्रोम सारखे आजारही उद्‌भवतात. 
4. स्क्रीन ऍडिक्‍शनमुळे मेंदूत डोपामिन, ऍड्रेनेलीन सारखी संप्रेरके अतीप्रमाणात स्त्रवतात आणि सेन्सरी ओव्हरस्टीम्युलेशन, रक्तदाबातील चढउतार, विचित्र प्रतिक्रिया, एकाग्रतेचा अभाव, ताणतणाव असे गंभीर परिणाम दिसून येतात. 
5. स्क्रीनवरील कार्टून्स, विडिओ गेममधील भराभर बदलत जाणारे चित्र आणि आवाज यांचा मेंदूवर दूरगामी वाईट परिणाम होवून आकलन संबंधीच्या अनेक समस्या मुलांमध्ये दिसून येतात. 
6. इंटरनेटद्वारे बाल लैंगिक छळ, शारीरिक मानसिक छळ, ब्लॅकमेलींग होते किंवा होवू शकते आणि अशा घटनांची संख्या पालकांची काळजी वाढावी इतपत आहे. 

मोबाइल ऍडिक्‍शन टाळण्यासाठी 
1. मोबाइल फ्री इंटरनेट फ्री डे पाळावेत. 
2. पालकांनी घरात होणारा मोबाइलचा वापर मर्यादीत ठेवावा. 
3. मुलांशी सुसंवाद ठेवावा, वर्तनातील बदलावर लक्ष ठेवावे. 
4. जाणवलेला बदल त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. 
5. मुलांना मोकळ्या मैदानावर खेळायला पाठवावे. 
6. वाचन, लेखण, संगीत, चित्रकला यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. 
7. मुलांना वर्तमानपत्र वाचण्यास प्रवृत्त करावे, चालू घडामोडींविषयी चर्चा करावी. 
8. कौटुंबिक स्नेहसंमेलनांमध्ये त्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी वाव द्यावा. 
9. सुट्टीच्या वेळी गडकिल्ले, नैसर्गिक, पर्यटन स्थळी त्यांना सहलीला घेवून जावे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News