लातूरची कोमल सोमारे बनली अभिनेत्री; साकारते या मालिकेत महत्वाची भुमिका

सुशांत सांगवे
Thursday, 18 July 2019

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींची लग्न ठरवली जातात. तशीच तयारी आमच्याही घरी सुरू झाली होती. त्यातच मालिका आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. अशावेळी लग्नाचा विषय बाजूला ठेऊन कुटुंबिय माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळेच आज अभिनेत्री म्हणून काम करू शकत आहे.

लातूर : लातूरातील तरुणांनी राजकारण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, लेखन, गायन इतकंच नव्हे तर गिर्यारोहनाच्या क्षेत्रातही आपला झेंडा रोवला आहे. आता अभिनयाच्या क्षेत्रातसुद्धा ठसा उमटवला जात आहे. नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलेली लातूरची कोमल सोमारे अभिनेत्री बनली असून 'श्री लक्ष्मीनारायण' या बहुचर्चित मालिकेत सध्या ती पार्वतीची भूमिका साकारत आहे. मालिकेबरोबरच ती चित्रपटातही काम करत असून दिवाळीत तिचा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोमल ही मूळची लातूर जिल्ह्यातील अहमदपूरची. तिथेच तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पूर्ण केले तर नाट्यशास्त्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात घेतले. तिथेच लोककला या विषयात ती पीएच.डी पूर्ण करत आहे. शिक्षण पूर्ण करत करतच कोमलने अभिनयाचा छंद जोपासला आहे. उल्लेखनीय अभिनयामुळे तिचे नाव सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर 'यीनबज'ने तिच्याशी संवाद साधला.

कोमल म्हणाली, माझा जन्म उदगीरमध्ये झाला. वडील कृषी अधिकारी होते. त्यामुळे काही वर्षे आम्ही उदगीरमध्ये राहिलो; पण नंतर अहमदपूरमध्ये स्थायिक झालो. तिथे शिकत असताना मी वेगवेगळ्या नाटकांत, पथनात्यात काम करत गेले. पथनाट्याचे दिग्दर्शनही करू लागले. संच घेऊन ठिकठिकाणी जात पथनाट्य सादर करण्याची संधीही मिळाली. त्यातून नाटकाची, अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यामुळे पुढे हेच शिक्षण घेत गेले. वास्तविक, आमच्या घरी कोणीही या क्षेत्रात नाही; पण आवडीच्या क्षेत्रातच करिअर करायचे, हे ठरवून मी वाटचाल करत आहे. या निर्णयाला कुटूंबियांनी पाठींबा दिला.

सुरवातीला काही नाटकांत काम करत गेली. त्यापैकीच एक म्हणजे ‘शिवाजी अंडरग्राऊंड...’. यात मी अक्काची भूमिका साकारली होती. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देत राहीले. त्यातून माझी ‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकेसाठी निवड झाली. परेश मोकाशी यांच्या मराठी चित्रपटात माझी भूमिका आहे. तो चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल, असे सांगून कोमल म्हणाली, ‘‘ग्रामीण भागातही टॅलेंन्ट आहे. पण त्याला योग्य दिशा मिळाली पाहीजे. चित्रपट किंवा मालिका या क्षेत्रात जाताना आपली फसवणूक होते, ऐवढेच आपल्याला माहिती आहे; पण तसे नाही. योग्य मार्गाने आपण पुढे जात राहायचे असते.’’नाटकात अभिनय करायची सवय असली तरी कॅमेरासमोर अभिनय करताना मी सुरवातीला काहीसे घाबरले होते. पण आता चांगलीच रुळले आहे, असा अनुभवही तिने सांगितला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News