लांबलेला पिरियड ड्रामा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019

मोगल आणि राजघराण्यांची सत्ता कमी कमी होत जाते. राजे-महाराजे आणि त्यांची संस्थाने यांच्यात वाद निर्माण होतात आणि आपआपसामध्ये ते भांडत असतात आणि नेमका त्याचा फायदा ब्रिटिश उचलत असतात.

कपाळावर लाल टिळा, डोळ्यांमध्ये काजळ... केस घट्ट बांधलेले आणि चेहऱ्यावर भस्म फासलेला असा काहीसा वेगळा आणि हटके लूक असलेला अभिनेता सैफ अली खानच्या ‘लाल कप्तान’ या चित्रपटाचा टीझर जेव्हा लाँच झाला तेव्हा त्याचे चाहते भलतेच अवाक्‌ झाले. सैफचा साधूच्या अवतारातील हा लूक पाहून सगळ्यांना आश्‍चर्य वाटले. नेमके काय असेल या चित्रपटात... कशा प्रकारची कहाणी असेल... वगैरे वगैरे ठोकताळे बांधले गेले आणि अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट आपल्याला अठराव्या शतकात घेऊन जातो. त्यावेळी ब्रिटिशांचे हळूहळू हिंदुस्थानात आगमन झालेले असते. तेव्हा मोगल आणि राजघराण्यांची सत्ता कमी कमी होत जाते. राजे-महाराजे आणि त्यांची संस्थाने यांच्यात वाद निर्माण होतात आणि आपआपसामध्ये ते भांडत असतात आणि नेमका त्याचा फायदा ब्रिटिश उचलत असतात. एकीकडे ब्रिटिश हळूहळू हिंदुस्थानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नागा साधू (सैफ अली खान) रहमत खान (मानव वीज) या क्रूर आणि धोकेबाजाला शोधत असतो. गेली पंचवीस वर्षे तो त्याचा शोध घेत असतो. त्याला त्याचा बदला घ्यायचा असतो. कारण लहान असताना रहमत खानने त्याच्यावर अन्याय केलेला असतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी हा साधू त्याला शोधत असतो. मग त्यामध्ये तो यशस्वी होतो का... हा साधू त्याचा शोध का घेतो वगैरे प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात सापडतील.

दिग्दर्शक नवदीप सिंहने बनवलेल्या या पीरियड ड्रामामध्ये सैफ अली खानने आपल्या भूमिकेवर आणि लूकवर खूप मेहनत घेतली आहे. त्याने कमालीचा अभिनय केला आहे. दीपक डोब्रियाल, मानव वीज, झोया हुसैन, सिमॉन सिंह यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे मानव वीजची क्रूरता आणि खुनशी वृत्ती त्याच्या डोळ्यांतून आणि संवादातून निश्‍चित जाणवते.
पीरियड ड्रामा म्हटलं की साहजिकच कॉश्‍च्युम्स आणि लोकेशन्स या बाबी महत्त्वपूर्ण असतात. या बाबी उल्लेखनीय अशाच आहेत. सिनेमॅटोग्राफर शंकर रमन यांची यामध्ये मोलाची कामगिरी झाली आहे. मात्र चित्रपटात फारसे काही टर्निंग पॉइंट नाहीत. शिवाय लांबी खूप आहे आणि काही दृश्‍यांमध्ये चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. त्यामुळे हा पीरियड ड्रामा म्हणावा तसा रोमांचकारी झालेला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News