पावसासोबत विराटसुद्धा बरसला, भारतापुढे विंडीजची नांगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • विंडीजविरुद्ध वनडे मोहीमही फत्ते,
  • विराट कोहलीचे पुन्हा शतक

पोर्ट ऑफ स्पेन :  मायदेशात स्वातंत्र्यदिनाचा तिरंगा झळकावण्याअगोदरच विराट कोहलीच्या टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये मालिका विजयाचा झेंडा मानाने फडकावला. कर्णधार विराटचे सलग दुसरे शतक आणि त्याने श्रेयस अय्यरसह केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने अखेरच्या तिसऱ्या सामन्यात सहा विकेटने विजय मिळवला आणि मालिका २-० अशी जिंकली. भारताने विंडीजविरुद्ध सलग नववी एकदिवसीय मालिका जिंकली .

विराटचे हे ४३ वे एकदिवसीय शतक ठरले आहे. त्याची नाबाद ११४ धावांची खेळी केली आणि दोन फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने दिलेले ६५ धावांचे योगदान यामुळे भारताने विजयासाठी असलेले २५५ धावांचे आव्हान ३२.३ षटकांत पार केले. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे भारतासमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी १६ चेंडूत २५ धावांची जोरदार सलामी दिली होती; परंतु  शिखर धवनने चोरटी धाव घेण्यास प्रतिसाद न दिल्यामुळे रोहित धावचीत झाला.

मागील पानावरून पुढे...
गतसामन्यातील शतकी खेळी मागील पानावरून पुढे चालू अशा थाटात विराटने सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला शिखर धवन चेंडूमागे एक धाव या गतीने फलंदाजी करत होता, सर्व काही व्यवस्थित सुरू होते, मध्येच माशी शिंकली. विंडीजचा फिरकी गोलंदाज फॅबिन अलेनने अगोदर धवनला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभ पंतलाही माघारी धाडले. १ बाद ९१ आणि ३ बाद ९२ अशी अवस्था झाली. याच दपणाखाली श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्यानेही विराटप्रमाणे मागील पानावरून पुढे अशा आत्मविश्‍वासाने फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज : ३५ षटकांत ७ बाद २४० (ख्रिस गेल ७२ -४१ चेंडू, ८ चौकार, ५ षटकार, एविन लुईस ४३ -२९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, निकोलस पूरन ३० -१६ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, महम्मद शमी ७-१-५०-२, खलिल अहमद ७-०-६८-३). (आव्हान ३५ षटकांत २५५ धावा) पराभूत वि. भारत : ३२.३ षटकांत ४ बाद २५६ (शिखर धवन ३६ -३६ चेंडू, ५ चौकार, विराट कोहली नाबाद ११४ -९९ चेंडू, १४ चौकार, श्रेयस अय्यर ६५ -४१ चेंडू, ३ चौकार, ५ षटकार, फॅबिन अलेन ६-०-४०-२).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News