"घर वापसी" पालकांना मराठी शाळेची ओढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • शाळा गजबजल्या; कोपर, मुर्बी, ओवापेठ, खारघर गावात विद्यार्थी वाढले
  • इंग्रजीला कंटाळून पालकांचा ओढा पुन्हा मराठी शाळांकडे वाढू लागला असून, सध्या खारघर परिसरातील काही जिल्हा परिषद शाळा गजबजल्या आहेत. ​

खारघर - इंग्रजीला कंटाळून पालकांचा ओढा पुन्हा मराठी शाळांकडे वाढू लागला असून, सध्या खारघर परिसरातील काही जिल्हा परिषद शाळा गजबजल्या आहेत. विशेषतः बहुभाषिक मुलांना मराठी भाषेत शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत आहेत.

खारघरला ग्रामस्थांनी मुले इंग्रजी शाळेत दाखल केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या होत्या; मात्र शहराच्या विकासात भर पडत असताना पालकांचा ओढा इंग्रजी शाळेकडे वळू लागला.

सर्वसामान्यांपासून हाय प्रोफाईल समाज इंग्रजी शाळांकडे वळू लागला. दरम्यान, शिक्षण संस्थांनी अवाच्या सव्वा शुल्कवाढ करून शिक्षणाच्या नावाखाली लूट केली जात असल्याने सर्वसामान्य घरातील पालकांनी इंग्रजीसोबतच मराठी शाळाही अत्यंत महत्त्वपूर्ण व तितक्‍याच तोलामोलाची असल्याने कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांतील बहुभाषिक कामगार, सर्वसामान्य घरातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे काही शाळा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत.

पाहिले सातवीपर्यंत वर्ग असलेल्या कोपरगाव ३१३, मुर्बी २४१, ओवापेठ २०४, खारघर गाव ५७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बेलपाडा, रांजणपाडा येथील प्राथमिक शाळेत ३० ते ३५ मुले शिक्षण घेत आहेत. खारघर, मुर्बी, कोपरा आणि ओवापेठ परिसरातील काही पालकांनी प्रथम मुलांना इंग्रजी शाळेत दाखल केले होते; मात्र खासगी शाळेत दर वर्षी शैक्षणिक शुल्कात वाढ करीत असल्यामुळे काही पालकांनी इंग्रजी वर्ग सोडून जिल्हा परिषद शाळेत दाखल केले आहे.

शाळेत बहुभाषक मुले आहेत. हिंदी भाषक असलेल्या मुलांना सुरुवातीच्या काळात मराठीचे धडे हिंदीत समजावून सांगावे लागतात. हळूहळू मराठी ज्ञान ती मुले अवगत करतात. नंतर ती मराठी वाचन, लिखाण करू लागतात.
- राजेश वाशीकर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा, मुर्बी

प्रथम काही पालक मुलांना इंग्रजी शाळेत दाखल करतात; मात्र खासगी शाळेत शैक्षणिक शुल्क भरमसाट असल्याने पुन्हा मराठी शाळेत प्रवेश घेतात. अशांना शिक्षण द्यावे लागते.
- रमेश सोनवणे, शिक्षक, ओवापेठ जिल्हा परिषद शाळा

खारघर गावातील जिल्हा परिषद शाळा मध्यभागी आहे. त्यामुळे मुलांची संख्या अधिक आहे. दर वर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत ३० ते ४० ने वाढ होत आहे. बहुभाषक मुलांना एकत्र करून मराठी भाषेत शिक्षण देण्याचे कठीण काम शिक्षक करीत आहेत.
- पांडुरंग चौधरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा खारघर गाव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News