स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य घटक असा ठेवा सांभाळून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 June 2019

तांब्या पितळ्याच्या भांड्यांना न्टीक नावाची बिरुदावली प्राप्त झाली आहे. तांब्याचा बंब आणि पितळेचं घंगाळं मोठ्या सन्मानानं ती मिरवत असतात. आता किचनमध्ये प्लॅस्टिक-काच ह्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिसायला चकचकीत आणि घासायला सोपे

भांडी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या, वयाच्या माणसांसारखी लहानमोठी विविध आकाराची भांडी. एखादी सुगृहिणी ज्याप्रमाणे सासरच्या वेगवेगळ्या विचारांच्या, वयाच्या माणसांबरोबर कधी मिळतं जुळतं घेते, तर कधी वैचारिक फेकाफेकी करत नेटाने संसार करते तसेच या भांड्याच्या बाबतीतही असते.

आई पूर्वी दसऱ्याबरोबरच उन्हाळी सुट्टीतही भांडी घासायला काढायची. आईच्या भांड्यामध्ये टोप, शंकुतला, भांडे, लगडी पातेली अशी नावं असलेली, सुबक आकाराची भांडी असायची. शकुंतला भांड्यात ताजं कढवललं तूपच ठेवलं जायचं. ताजं कढवलेलं तूप असलं की, ते भांडं अगदी हळदी-कुंकवाला जाणाऱ्या सुवासिनीसारखं भासायचं. सात्विक. दोन कानाचे चहाचं भांडं आणि कासंडी हे म्हणजे जुन्या मराठी सिनेमातल्या कर्मठ सासरा आणि खाष्ट सासूसारखी असतात. चहा आणि ताक या व्यतिरिक्‍त त्यात काही म्हणजे काही करता येत नाही. पाणी भरून ठेवलेली कासंडी मला शाळा सुटल्यावर आईची वाट पाहणाऱ्या चिमुरडीसारखी दिसते.
 
टोप हे खरंच नावाप्रमाणे भारदस्त भांडं! चिंचेने घासल्यामुळे झळाळी प्राप्त झालेल्या या भरदार तांब्याच्या टोपातला शिगोशिग भरलेला पांढरा शुभ्र भात! यातील ऐश्‍वर्यसंपन्न नक्‍की कोण? शुभ्र वाफाळता कळीदार भात की, तो लखलखता टोप. वरून फाटक्‍या तोंडासारखं रुद्र आणि गाभ्यात अरुंद! तसराळं! यात पोळीपासून कोशिंबिरीपर्यंत आणि भाजीपासून पापड, कुरडईपर्यंत काहीही ठेवलं तरी काही फरक पडत नाही. ना चवीत, ना आकारात.

रोजच्या फोडणीचं तेल ठेवण्याच्या भांड्याला कावळा का म्हणायचं हे मला अद्याप नीटसं कळलेलं नाहीए; पण एवढं मात्र खरं की, तेल आणि कावळा यांचं नातं दगडी आणि हिरव्या चटणीच्या नात्याएवढंच अभेद्य आहे. मोर्चात, सभेला गर्दी करायला कशी बिनचेहऱ्याची माणसं लागतात, गंजनायक भांड्याचे अगदी तस्सं आहे. फडताळात भांड्यच्या भाडगर्दीत कुठेतरी हरवलेलं! आई-आजीचं स्वयंपाकघर आता इतिहासजमा झालं आहे.

तांब्या पितळ्याच्या भांड्यांना न्टीक नावाची बिरुदावली प्राप्त झाली आहे. तांब्याचा बंब आणि पितळेचं घंगाळं मोठ्या सन्मानानं ती मिरवत असतात. आता किचनमध्ये प्लॅस्टिक-काच ह्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिसायला चकचकीत आणि घासायला सोपे. चमचे, ओगराळं, पळी हे सर्व सर्व्हिंग स्पून नावाच्या पक्षात सामील झाले आहेत.

दांड्याची पातेली, सतेलं, कुंडा ह्यांना सर्व्हिंग बाऊल म्हटलं जातं. त्या वलयात त्यांचा वेगळेपणा हरवला आहे. ह्या सर्व भाऊगर्दीत रवी, तवा, पोळपाट, लाटणं, किसणी आपलं अस्तित्व टिकवून आहेत. पुढची काही दशकं तरी त्यांच्या स्वातंत्र्याला कोणी धक्‍का लावू शकत नाही. आळूची भाजी काचेच्या सर्व्हिंग बाऊलमध्ये कितीही केविलवाणी दिसली तरी हा बदल अपरिहार्यच आहे आणि तो स्वीकारणं अनिवार्य आहे  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News