कतरा कतरा मिलती है...

हेमंत जुवेकर
Monday, 22 July 2019

गुलजारचा `इजाजत` हा सिनेमा, कमर्शियल ब्रेक घेऊन पहाण्याचा सिनेमा नाहीच. तो सुरुवातीपासून रंगून आणि गुंगून पाह्यला तरच त्यातली नजाकत अनुभवता येते. त्यातला पाऊस आणि पावसासारख्याच बरसणाऱ्या आठवणीं खास आठवणीत ठेवाव्या अशाच. 
 

इजाजत म्हटलं की आठवतं, ते `मेरा कुछ सामान` हेच गाणं, आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी. (हे काव्य पाहून आरडी गुलजारला म्हणाला होता, अरे यार ये कोई गाना है, कल को पेपरका हेडलाईन लाकर दोगे और कहोगे के इसको धुन मे बिठादो...) 
 हे आठवणींचं गाणं आशाने भन्नाट गायलंयच, पण तत्पुर्वी नसिरुद्दीनच्या आवाजात ती (मायाने टेलिग्राफिकली पाठवलेली) कविता ऐकणं हाही एक अनुभवच. (एक दफा वो याद है तुमको, बिन बत्ती सायकील का चालान हुवा था, हमने कैसे भुके प्यासे बेचारोसे अॅक्टिंग की थी, हवलदार ने उल्टा अठ्ठनी देकर भेज दिया था, एक चव्वनी मेरी थी, वो भिजवादो... ही त्यातली सुरुवात गाण्यात नाही.)

हे गाणं इतकं मस्त जमून आल्यामुळेच की काय इजाजत आणि मेरा कुछ सामान हे समीकरणच झालंय. पण इजाजतमधली इतर गाणीही खूपच सुरेख होती. विशेषतः खाली हात शाम आई है.  पण या दोन सुरेख गाण्यांबरोबर, आणखी दोन गाणीही होती त्यात. तीही छानच होती, पण या सुरेख गाण्यांनी काहीसा अन्यायच केलाय त्यांच्यावर, असं वाटत रहातं. ती गाणी  म्हणजे  `छोटीसी कहानी से, बारिशोके पानीसे...` आणि `कतरा कतरा मिलती है...`

पैकी `कतरा कतरा` मध्ये आशाबाईंचा ओव्हरलॅपिंग आवाज काय मस्त कमाल करतो. `खाली हात शाम` हे खास रेखाचंच गाणं वाटतं. पण `कतरा कतरा` ऐकताना ते अनुराधा पटेलवर चित्रित व्हायला हवं होतं असं वाटतं रहातं. या सिनेमातली रेखाची व्यक्तिरेखा (सुधा) शांत-संयत, तर अनुराधा (माया) खूपच चुलबुली, पण तरीही उधळ नव्हे.(  सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे इक खतमे लिपटी रात पडी है म्हणणारी उथळ असेलच कशी?)    त्यामुळेच,  `कतरा करता मिलती है, कतरा कतरा जिने दो, जिंदगी है, बहेने दो, प्यासी हू मै प्यासी रहेने दो,` असं म्हणणारी मायाच असावी असं वाटत रहातं. कारण तिचं सिनेमातलं व्यक्त होणं तसंच आहे, शिवाय आशाबाईंनीही आवाज असा लावलाय की त्यातूनही तिचंच(मायाचं) असणं जाणवत रहावं.

   यातून सुधाने महिंदरच्या आयुष्यात घेतलेली तिची जागा दाखवायची असेल का? गुलजारच जाणे!
   हनीमुनला आलेल्या जोडप्यावरचं हे गाणं असल्यानं त्यावेळचं ते स्वप्नाळू वातावरण शब्दातून दिसतं आणि पडद्यावरही जाणवतं!

कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था..नींद में फिर तुम ने जब छुआ था गिरते गिरते बाहों में बची मै हो सपने पे पाँव पड़ गया था..

हे स्वप्नावर पाय पडल्यानं बहुपाशात अडकणं खासच. म्हटलं तर ही गुलजारची चमत्कृती, पण शोधलं तर यात सिनेमाच्या कथेचे संदर्भही सापडू शकतात. आणि ते पुढच्या कडव्यात अधिकच स्पष्ट होतात आणि या दोन व्यक्तिरेखांतला फरक दिसू लागतो. कारण यात ती म्हणत असते, `तुला आकाशाची आकांशा असली तरी माझी पावलं जमीनीवरच आहेत, त्यामुळेच की काय तु माझा झालायस पण तरीही मला सापडलायस असं नाही वाटत मला... पण जाऊंदे अशाही आयुष्यात रंगत असेलच कदाचित...` 

तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरो मैं ज़मीं है 
पाके भी तुम्हारी आरज़ू हो 
शायद ऐसी ज़िंदगी हसीं है 
आरज़ू मैं बहने दो 
प्यासी हुँ मै प्यासी रहेने दो... 

असं म्हणतात की गुलजार सहज म्हणून बोलतात, त्याचीही कविता होते. मग सिनेमासारख्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं कवितेपेक्षा कमी कसं असेल? त्या काव्यमय सादरीकरणातली ही कविता पडद्यावर दिसते तेव्हाही भावते आणि फक्त ऐकतानाही आवडते. कदाचित थोडी जास्तच. कारण पडद्यावर गुलजार जे दाखवतो ते दिसतं, पण ऐकताना जे दिसतं, जाणवतं ते आपल्याच आत असतं, आधीपासून...

अनेक गोष्टी असतात अशा, अनावर पावसासारख्या अनावर आठवणी जागवणाऱ्या. पण त्या आठवणीतच वाहून नसतं जायचं. याच सिनेमात महिंदर (नसिर) सांगतो सुधा(रेखा)ला, जो बित गया है, उसे बित जाने दो, उसे पकडके मत रखो... जे गेलंय त्याला धरून ठेवण्यात काय हशील. काळाची दुधारी तलवार ती. कितीही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी निसटून जाणारच हातातून. जितकी जास्त घट्ट पडण्याचा प्रयत्न करू आपण तितके अधिक जखमी होणार...

त्यामुळे हे लक्षात घ्यायलाच हवं, की आयुष्यात सगळंच जे हवं हवसं वाटेल ते मिळेतंच असं नाही. पण, जेवढे थेंब (कतरा, कतरा) वाट्याला येतील त्यात समाधान मानायला काय हरकत आहे? 

...कारण `प्यासी हूँ मै, प्यासी रहेने दो` मध्येही `गोडी अपुर्णतेची` आहेच की! 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News