"काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही उद्या लचके तोडले जातील" : राज ठाकरे

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही उद्या लचके तोडले जातील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई : काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही उद्या लचके तोडले जातील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

"मनसे'च्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. राज म्हणाले की, आज काश्‍मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर ते बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरते नसून इतर राज्यांसाठीही लागू आहे. उद्या महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही, तर मराठी म्हणून फिरेल, असा इशारा राज यांनी दिला. या वेळी त्यांच्या टीकेचा रोख हा केंद्र, राज्य सरकार आणि भाजप समर्थकांच्या दिशेने होता. 

लोकसभा निवडणुकीत 371 मतदारसंघांत घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली. 370 वे कलम रद्द केल्याने पेढे वाटले जात आहेत, पण 371 मतदारसंघांत घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही, असे ते म्हणाले. 

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे, असा संताप व्यक्त केला. कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार, हे सांगताना राज यांनी गौप्यस्फोट केला की, "भाजपमधील एक वरिष्ठ व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे ईव्हीएम मशिन्स नाहीत. हे कोण आणि कधी बोलले ते बाळा नांदगावकर यांना माहिती आहे.'' 

ज्येष्ठांना प्लॅन करून पाडले 
चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गिते आणि शिवाजीराव आढळराव पाटील या शिवसेनेच्या चार ज्येष्ठ खासदारांना प्लॅन करून पाडण्यात आले, असा आरोप राज यांनी केला. भाजप आणि शिवसेनेने ईव्हीएमच्या मदतीने हे घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिम आणि हिंदूंमध्ये कायम तणाव राहावा म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना निवडून आणण्यात आले. त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला. अमरावतीत अडसूळ यांच्याऐवजी नवनीत राणा, शिरूरमध्ये आढळरावांच्या ठिकाणी अमोल कोल्हे निवडून आले. हे सारे ईव्हीएमच्या करामतीमुळे घडले. या चार ज्येष्ठ खासदारांना मंत्री करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा पराभव घडवून आणण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News