कार्तिकेय गुप्ता जेईई ॲडव्हान्समध्ये देशात प्रथम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

पुण्यातील जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५० विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळविले आहेत. 

जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशातील जवळपास एक लाख ६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील जवळपास ३८ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पाच हजार ३५६ विद्यार्थिनी आहेत. कार्तिकेय याने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे; तर माधापूर येथील शबनम सहाय ही मुलींमधून देशात पहिली आली.

तिला ३७२ पैकी ३०८ गुण मिळाले असून, ती देशपातळीवर दहाव्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून एकूण १५ हजार ५६६ विद्यार्थी, खुल्या प्रवर्गामधू (ईडब्ल्यूएस) तीन हजार ६३६, इतर मागास वर्गातून सात हजार ६५१, अनुसूचित जातींमधून आठ हजार ७५८ आणि अनुसूचित जमातींमधून तीन हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुण्यातील जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५० विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जेईई मेन्स परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या देशातील १५ विद्यार्थ्यांमध्ये कार्तिकेय होता. कार्तिकेय म्हणाला, ‘‘मला देश पातळीवर पहिला क्रमांक मिळाल्याचा खूप आनंद आहे. परंतु जेईई मेन्सच्या तुलनेत जेईई ॲडव्हान्स परीक्षा कठीण होती. परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्यावर मी भर दिला.’’

यंदाची जेईई ॲडव्हान्स परीक्षा तुलनेने अवघड होती. गेल्या १४ वर्षांमध्ये २०१६ मधील पेपर सर्वांत कठीण समजले जात होते. परंतु, यंदाच्या पेपरची काठिण्यपातळीही त्यापेक्षाही अधिक होती. परंतु विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या जवळपास जाणारा यंदाचा कट ऑफ आहे.
- दुर्गेश मंगेशकर, व्यवस्थापकीय संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

 या वर्षी ॲडव्हान्समध्ये ३७२ पैकी ३४२ चा स्कोर हेच दर्शवते की, गेल्या काही वर्षांतील हाच भरघोस निकाल आहे. गणिताचा पेपर नेहमीपेक्षा अवघड होता; परंतु केमिस्ट्रीचा पेपर सर्वात सोपा; तर फिजिक्‍स गेल्या काही वर्षांप्रमाणेच होता. त्याचेच प्रत्यंतर या निकालामधून दिसून येते.
- संदीप देवधर, संचालक, देवधर ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स (DEA)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News