कर्नाटकी राजकारण महाराष्ट्रात पेटले!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • मनधरणी निष्फळ
  • काँग्रेस नेत्यांची मुंबईत धरपकड
  • रेनेसॉ हॉटेलमध्ये लोकशाहीचे "वगनाट्य'
  • महाराष्ट्रात मार्शल लॉ असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई / बंगळूर : कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा, नसीम खान यांना ताब्यात घेतले होते. 

आठ बंडखोर आमदारांनी आज कर्नाटक सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले, तर काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिल्याने आघाडीच्या सिंहासनाला पुन्हा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे आमदार के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांनी आज राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनीही आपण तत्काळ हे राजीनामे स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

कर्नाटकी सत्तेचा मुंबईत ड्रामा
कर्नाटकच्या सत्तेचा आज पवईच्या हॉटेलसमोर जबरदस्त ड्रामा झाला. लोकशाहीचे हे वगनाट्य मुंबई पोलिसांच्या चिरेबंदी सुरक्षेने काँग्रेस नेत्यांची अटक व सुटका असे रंगले. 

कर्नाटकचे दहा बंडखोर आमदार हॉटेल रेनेसॉमध्ये तळ ठोकून होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे तख्त पलटवून लावण्याचा अखेरचा निर्णायक डाव या आमदारांनी टाकला होता. सलग तीन वेळा फसलेले ऑपरेशन कमळ या वेळी परत कोमेजणार नाही याची सर्व दक्षता घेण्यात आली होती. मात्र कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक शिवकुमार यांच्या दाक्षिणात्य फिल्मीस्टाईलने झालेल्या एन्ट्रीने लोकशाहीचे हे वगनाट्य अधिकच रंगले.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास डी. के. शिवकुमार हॉटेलच्या आवारात दाखल झाले. पण बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांकडे रितसर तक्रार करत डी. के. यांना हॉटेलात येण्यापासून रोखण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेलला पोलिसांचे कडे पडले होते. त्यातच डी. के. यांनी माझी रूम हॉटेलमध्ये बुक असल्याचा पुरावा सादर केल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली. पण हॉटेल व्यवस्थापनाने डी. के. यांचे बुकिंग रद्द केले. या अडवणुकीमुळे डी. के. यांनी हॉटेलसमोरच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला अन काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. त्यातच बंडखोर आमदारांच्या काही समर्थकांनी डीके गो बॅकच्या घोषणा दिल्याने पडद्यामागच्या भाजपच्या रणनीतीचा भंडाफोड झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

दुपारपर्यंत पोलिसांनी या हॉटेलची नाकेबंदी केली व परिसरात १२ जानेवारी पर्यंत कलम १४४ लागू केले. दरम्यान मुंबई काँग्रेसचे नेते मिलींद देवरा, संजय निरुपम, नसीम खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हॉटेलकडे पोहचले. अखेर वाढता तणाव पाहून पोलिसांनी डी. के शिवकुमार यांच्‍यासह सर्व नेत्यांना ताब्यात घेवून कलिना विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये स्थानबद्ध केले. सायंकाळी शिवकुमार यांना सक्तीने विमानाने कर्नाटकला रवाना केले. या सर्व घडामोडीमागे भाजपचा हात असल्‍याचा आरोप  काँग्रेस 
नेत्यांनी केला.

मुंबई पोलिसांचा हल्ला असह्य : कुमारस्वामी
मुबईला गेलेले मंत्री डी. के. शिवकुमार व जी. टी. देवेगौडा यांच्यावर मुंबई पोलिसांनी केलेला हल्ला असहनीय असल्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात ट्‌विट करून संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेस व धजद युती सरकारचे असंतुष्ट आमदार मुंबईतील खासगी हॉटेलमध्ये मुक्कम ठोकून आहेत. त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना परत आणण्यासाठी शिवकुमार मुंबईला गेले आहेत. परंतु मुंबई पोलिसांनी शिवकुमार व त्यांच्यासोबत गेलेल्या कर्नाटकच्या आमदारांवर हल्ला करून त्यांना अटक केल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्‌विटमध्ये कुमारस्वामी म्हणतात,

‘कर्नाटकाचे मंत्री व आमदारांवर मुंबई पोलिसांनी केलेला हल्ला असहनीय आहे. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून आपली नैतिकता विसरणे योग्य नाही. महाराष्ट्र सरकार भाजपच्या घोडेबाजाराला अशाप्रकारे मदत करीत आहे. देशाच्या इतिहासातील हे एक कृष्णकृत्य आहे.’

कर्नाटकमधील बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे मंत्री शिवकुमार यांना मुंबईत पोलिसांनी मज्जाव केल्यावरून काँग्रेसने आज लोकसभेत भाजप सरकारवर हल्ला चढवला. महाराष्ट्रात मार्शल लॉ असल्याची तोफ डागून काँग्रेसने सभात्याग केला. 

काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पुन्हा एकदा राजकीय नाट्यावरून हल्लाबोल केला. सभापती ओम बिर्ला यांनी चौधरींना रोज एकाच विषयावर बोलू नका, असे सुनावताच चौधरी यांनी आज महाराष्ट्राबद्दल बोलत असल्याचे म्हणत कर्नाटकच्या घडामोडींवरून भाजपला पुन्हा  लक्ष्य केले. कर्नाटकचे सिंचनमंत्री डी. के. शिवकुमार मुंबईत हॉटेलमध्ये पोचले असता पोलिसांनी त्यांना अडवले. लोकप्रतिनिधींचा हा घोडेबाजार सुरू असून, गलिच्छ षड्‌यंत्र बंद करा, असेही टीकास्त्र चौधरी यांनी सोडले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News