कर्नाटकातील सत्तानाट्याचा समारोप !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

राजीनाम्याच्या आधी...
भाजप १०५
काँग्रेस ७९ 

(नियुक्त सदस्यांसह)
धर्मनिरपेक्ष जनता दल ३७
अपक्ष २
बसप १
एकूण २२४

राजीनाम्यानंतर....  
(१५ बंडखोर आमदार) (१२ काँग्रेस + ३ जेडीएस)
भाजप १०५
काँग्रेस ६७
धर्मनिरपेक्ष जनता दल ३४
अपक्ष २
बसप १
एकूण. २०८

बंगळूर, ता. १८ : कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडी सरकारच्या भवितव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी सभागृहात विश्‍वासदर्शक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर मतदान न होताच दिवसभर वादावादी आणि चर्चेचाच घोळ रंगला. यामुळे सकाळी ११ पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

व्हीपचे उल्लंघन केलेल्या सदस्यांवर प्रथम कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी लावून धरली; तर भाजप सदस्यांनी प्रथम विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली. त्यातून दोन्ही पक्षांच्या सदस्यांत जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा लांबणीवर टाकावे लागले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धाराय्या यांनी राज्यघटनेच्या दहाव्या कलमाचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभाध्यक्षांनी विश्‍वासदर्शक ठराव सध्या स्थगित ठेवून प्रथम व्हीपच्या वैधतेवर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार माझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक सर्वोच्च न्यायालयात जाणे आणि दुसरा सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणे. सभागृहात मी हा मुद्दा आता उपस्थित केला आहे. विधिमंडळाची स्वायत्तता राखली पाहिजे.१५ आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभावित होऊन पक्षाने व्हीप जारी केला असतानाही सभागृहात उपस्थित राहिलेले नाहीत. हे सरकारच्या दृष्टीने अयोग्य आहे. या प्रकरणाचा निकाल लावूनच नंतर सभागृहाने विश्‍वास प्रस्ताव हाती घ्यावा, अशी आमची इच्छा आहे,’’

असे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांची चिंता
यावर सभापती के. आर. रमेशकुमार म्हणाले,

‘‘सर्वोच्च न्यायालयात मला उत्तर द्यावे लागणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते या प्रकरणात पक्षकार नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयाने एक अंतरिम आदेश दिला आहे. ज्यामध्ये सदस्यांना उपस्थित राहण्याची सक्ती करता येत नाही. त्यामुळे ‘मी सभागृहाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. मला काळजी वाटते.’’

सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे आमच्या अधिकारांचे उल्लंघन करणारा आदेश दिला असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. भाजप नेते बंडखोर आमदारांना अधिवेशनात भाग न घेण्यास उद्युक्त करीत आहेत. बंडखोर आमदारांना विशेष विमानाने इतरत्र फिरविण्यात येत आहे, असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला.

...अन्‌ येडियुरप्पांनी आपले मत मागे घेतले
न्यायालयाच्या निर्णयाचा गैरअर्थ घेऊन विरोधी पक्षनेते बी. एस. येडियुरप्पा यांनी, न्यायालयाच्या निर्णयानुसार व्हीप जारी करता येत नसल्याचे सभागृहात सांगितले. त्याला मंत्री शिवकुमार, प्रियांक खर्गे, आर. व्ही. देशपांडे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. येडियुरप्पा सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर येडियुरप्पा यांनी आपले वक्तव्य मागे घेतले व काँग्रेसने हवे तर आपल्या आमदारांना व्हीप जारी करावा, असे सांगितले.

विरोधी पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्‍वासदर्शक प्रस्तावावर मतदान घेण्याची प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा आग्रह धरला. त्यांनी सभाध्यक्षांना एका दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी, नियम-१६४ अशा परिस्थितीवर लागू होत नसल्याचे स्पष्ट केले. येडियुरप्पा यांनी कितीही वेळ झाला तरी आम्ही सभागृहात थांबण्यास तयार असल्याचे सांगून विश्‍वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेण्याचा आग्रह धरला. परंतु सायंकळी सभाध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज स्थगित करून  सकाळी ११ पर्यंत अधिवेशन लांबणीवर टाकले.

आजच्या अधिवेशनात राजीनामा दिलेल्या १५ आमदारांसह २० सदस्य अनुपस्थित होते. श्रीमंत पाटील व बी. नागेंद्र यांनी गैरहजेरीबाबत कळविले आहे. बसपचे एम. महेश यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आज बहुमत सिद्ध करा : राज्यपाल
कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी  मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना दुपारी दीडच्या आत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांच्या या आदेशामुळे कर्नाटकातील सत्तानाट्याचा शुक्रवारीच सोक्षमोक्ष लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यास आणखी वेळ मिळावा म्हणून सत्ताधारी आघाडीकडून जाणीवपूर्वक विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चा लांबविली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News