कर्नाटकातील सरकार वाचविण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना आला वेग!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • सरकारला तात्पुरता आधार
  • आठ राजीनामे अध्यक्षांनी फेटाळले

बंगळूर : काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) राजीनामा दिलेल्या १३ आमदारांपैकी केवळ पाच आमदारांचे राजीनामे नियमात बसणारे असल्याची माहिती विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी दिली.

उर्वरित आठ आमदारांचे राजीनामे नियमबाह्य असल्याने त्यावर कारवाईसाठी सुनावणी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नियमबाह्य राजीनामे असलेल्या आमदारांनी दोन दिवसांत नियमाच्या चौकटीत राजीनामे देणार असल्याचे सांगून अपात्र ठरविण्याच्या काँग्रेसच्या धमकीला घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना रमेश कुमार म्हणाले, की १३ पैकी केवळ पाच राजीनामे नियमावली २०२ नुसार देण्यात आले आहेत. त्यामध्ये आनंद सिंग, के. सी. नारायणगौड, प्रतापगौड पाटील, गोपालय्या व रामलिंगा रेड्डी यांचा समावेश आहे. त्यांच्या राजीनाम्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्यास संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार १२ जुलैला दुपारी तीन वाजता आनंद सिंग, नारायणगौडा व प्रतापगौडा पाटील यांना त्यांची बाजू मांडण्यास संधी देण्यात येणार आहे. १५ जुलै रोजी गोपालय्या व रामलिंगा रेड्डी या दोघांची बाजू ऐकून घेण्यात येईल.

रमेश जारकीहोळींसह चौघांवर कारवाई करण्याची तक्रार विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी पूर्वीच दिली होती. त्याची सुनावणी ११ जुलैपासून होणार असल्याचे सांगून रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी व बी. नागेंद्र यांना त्यांची बाजू मांडण्यास पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी उमेश जाधव यांचा राजीनामा विधानसभाध्यक्षांनी मंजूर केला आहे. ते आता लोकसभेत गुलबर्ग्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

अन्य आठ आमदारांना योग्यरीतीने आपला राजीनामा सादर करण्यास रमेश कुमार यांनी सांगितले आहे. त्यानुसार जारकीहोळी, बी. सी. पाटील, शिवराम हेब्बार, महेश कुमठळ्ळी, एच. विश्वनाथ, एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराजू, मुनिरत्न यांना नियमावलीनुसार पुन्हा राजीनामे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे सहाजिकच कारवाईची प्रक्रिया आता लांबणार असून, सरकारला असंतुष्टांचे मन वळविण्यासाठी पुन्हा वेळ मिळाला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज झाली. राजीनामा दिलेल्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटकवरून गोंधळात राज्यसभा कामकाज तहकूब
नवी दिल्ली : कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी केंद्रातील सत्तारूढ भाजपने सारा जोर लावल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यसभेचे कामकाज संपूर्ण दिवस रोखून धरले. अधिवेशनात सभागृहाचे दिवसभराचे कामकाज गोंधळात वाहून जाण्याचा  पहिलाच दिवस.  

काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने अनुक्रमे कर्नाटक व सार्वजनिक कंपन्यांच्या विक्रीचा सपाटा सरकारने लावल्याच्या निषेधार्थ कामकाज स्थगितीच्या नोटिसा दिल्या होत्या. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी त्या फेटाळताच प्रथम ‘तृणमूल’चे सदस्य वेलमध्ये उतरले.

भाजप कर्नाटकमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून तेथील आमदारांची ‘शिकार’ करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे खासदार ‘मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी’, अशा घोषणा देत होते. याबाबत काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांनी दिलेली नोटीस फेटाळली गेल्यावर विरोधकांच्या गदारोळास सुरवात झाली. नायडू यांनी प्रथम सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी, नंतर दुपारी बाराला व अखेरीस दुपारी दोनला दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. 

कर्नाटकवरून युवा काँग्रेसचे आंदोलन
नवी दिल्ली : कर्नाटकातील आमदारांच्या फोडाफोडीवरून भारतीय युवा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर टीका केली असून, मंगळवारी संसदेजवळ बनावट नोटांनी भरलेली बॅग घेऊन अनोखे आंदोलन केले. 

युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास बीवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांकडे बनावट नोटांनी भरलेली बॅग होती. श्रीनिवास म्हणाले, की कर्नाटकमध्ये भाजप आमदारांची फोडाफोडी करत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात कृत्य असून, यासाठी आम्ही रस्त्यावर 
उतरलो आहोत.

आझाद, हरिप्रसाद बंगळूरला
कर्नाटकातील पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि बी. के. हरिप्रसाद आज बंगळूरला रवाना झाले. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हे दोघे रवाना झाले असून, पेचावर तोडगा काढण्यास त्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटकात जेडीएसबरोबर आघाडी करण्याच्या प्रयत्नांत अशोक गेहलोत यांच्याबरोबर आझाद यांचाही समावेश होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News