कर्नाटकाची आज अंतिम परीक्षा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • सत्तानाट्याचा आज निवाडा
  • विधानसभा अध्यक्षांनीही मागितला अवधी
  • बंडखोर सरकार पाडण्यासाठी एकत्र : कुमारस्वामी

नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तानाट्याचे रोज नवनवे अंक पाहायला मिळत आहेत. सर्वोच्च न्यायपीठाने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवताना याबाबत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. या बंडखोर आमदारांच्या याचिकेवरील सुनावणीस प्रारंभ होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय खंडपीठ याचा निवाडा करेल.

न्यायालयाने बंडखोर आमदार, विधानसभेचे अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची बाजू ऐकून घेतली. विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनीही न्यायालयामध्ये नमती भूमिका घेतली, बंडखोर आमदारांचे राजीनामे आणि त्यांच्या अपात्रतेबाबत बुधवारपर्यंत आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामे देणारे आमदार कधीच आपल्यासमोर आले नव्हते, असा दावाही त्यांनी केला.

ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनी कुमारस्वामी यांची बाजू न्यायालयामध्ये मांडली. ते म्हणाले की, ‘‘हा कुणा एका व्यक्तीचा खटला नसून, तो दहा आमदारांचा आहे. यावर सायंकाळपर्यंत निर्णय होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यकक्षेबाहेरचे आदेश दिले असून, हा विषय न्यायालय आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्यातील नसून, तो विद्यमान मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्यांमधील आहे. सरकार अस्थिर करण्यासाठीच हे आमदार कळपाने फिरत असून, न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेऊ नये.’’

अध्यक्षांची सुधारणेची विनंती
विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी न्यायालयास पूर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा करावी, अशी विनंती केली, तत्पूर्वी कर्नाटकमधील राजकीय उलथापालथींबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. बंडखोर आमदारांनीदेखील विधानसभा अध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप केला होता. याबाबत आज विधानसभा अध्यक्षांनी त्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली. ज्येष्ठ विधिज्ञ ए. एम. सिंघवी यांनी आज रमेशकुमार यांची बाजू न्यायालयात मांडली. बंडखोर आमदारांचे राजीनामे आणि त्यांच्या अपात्रतेबाबत आपण उद्या  पर्यंत निर्णय घेऊ; पण न्यायालयाने याआधी दिलेले ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याच्या आदेशामध्ये सुधारणा करावी, अशी विनंती अध्यक्षांकडून करण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News