राज्याच्या सुपर फिप्टीमधे कळमनुरी प्रकल्प अव्वल

मंगेश शेवाळकर
Tuesday, 9 July 2019

राज्यातील अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गंत प्रकल्पामधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे प्रवेश देऊन त्या ठिकाणी खाजगी क्लासेसची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हिंगोली: राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी व वैद्यकिय अभ्यासक्रमास प्रवेशासाठी तयारी करून घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या सुपर फिप्टीच्या प्रथम परिक्षेत अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत १३९ विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त ५३ विद्यार्थी कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील आहेत.

राज्यात आदिवासी आश्रमशाळांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून होतकरू विद्यार्थ्यांचे अभियंता व डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यातील अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गंत प्रकल्पामधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे प्रवेश देऊन त्या ठिकाणी खाजगी क्लासेसची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यासाठी सुपर फिप्टी अंतर्गत होतकरू विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन त्यांना पुणे येथे आकरावी व बारावीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्पातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रथम परिक्षा नुकतीच घेण्यात आली असून त्याचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

यामधे अभियांत्रीकीकडे कल असलेले ८४ तर  वैद्यकिय अभ्यासक्रमाकडे कल असलेले ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामधे धारणीप्रकल्पातून चौदा, कळमनुरी ५४, किनवट २५, पुसद ४४, पांढरकवडा शुन्य, औरंगाबाद एक, अकोला प्रकल्पातून दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

रविवारी दुसरी परिक्षा होणार डॉ. विशाल राठोड, प्रकल्पाधिकारी कळमनुरी
अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची दुसरी चाचणी परिक्षा रविवारी (ता.१४) अमरावती येथे घेतली जाणार आहे. त्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे  आदिवासी शाळांमधून प्रवेश दिला जाणार असून  खाजगी शिकवणी वर्ग देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News