"काका, हे पैसे महे नव्हत" सांगत चिमुकलीने परत केले पैसे

मंगेश शेवाळकर
Thursday, 18 July 2019

पिंपळदरीच्या अंगणवाडीतील विद्यार्थीनीचा प्रमाणिकपणा

हिंगोली: "काका, हे पैसे महे नव्हत, ज्याचे कुणाचे हायत त्यांना द्यावे" असे म्हणत पिंपळदरी (ता. औंढा)  येथील चिमुकली स्वाती मारोती ढेंबरे हिने रस्त्यात सापडलेले दहा रुपये परत दिले. तिच्या प्रामाणिकपणाचे गावकऱ्यांनी तोंडभरून कौतूक केले. 

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावामधे अंगणवाडी आहे. या ठिकाणी गावातील सुमारे वीस ते पंचेविस विद्यार्थीनी येतात. सकाळी अंगणवाडीमधे आल्यानंतर पोषण आहार, खेळ, अभ्यास हा उपक्रम 
घेतला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना चांगल्या कथा सांगून त्यांच्यावर योग्य संस्कार देखील केले जातात. 

दरम्यान, आज सकाळी गावातील स्वाती मारोती ढेंबरे ही विद्यार्थीनी अंगणवाडीकडे निघाली होती. रस्त्यात तिला दहा रुपयांची नोट सापडली. सदर रक्कम देखील चिमुकलीसाठी मोठी होती. मात्र तिने इतर मैत्रीणींना सोबत घेऊन थेट सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांचे घर गाठले. सकाळी या मुली घराकडे कशा काय आल्या याची विचारणा श्री. घोंगडे व त्यांच्या पतीने शुध्दमती घोंगडे यांनी केली. 

यावेळी स्वाती हिने रस्त्यावर दहा रुपये सापडले असून ज्याचे असेल त्याला द्या असे म्हणत सदर नोट श्री. घोंगडे  यांच्या जवळ दिली. यावेळी  शुध्दमती घोंगडे यांनी विद्यार्थीनींना खाऊ दिला. दहा रुपयांचे मोल कमी असले तरी त्यांनी दाखविलेला प्रामाकिणपणा मोठा होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News