ज्योतीनं लावला अंधाऱ्या झोपडीत दिवा! 

मंगेश गोमसे
Friday, 25 January 2019

      मोलमजुरी करणारे अशिक्षित आई वडिल... टीनपत्र्याचं घर... त्यात वीजेचा साधा बल्बही नाही... पावसाळ्यात घरासमोर गुडघाभर चिखल... सर्वत्र अंधार... अशा विपरित परिस्थितीत आयुष्याचा एकेक क्षण काढणाऱ्या चौहान परिवारात ज्योती जन्माला आली आणि हळूहळू दिवस पालटू लागले. ज्योतीनं गरिबीशी दोन हात करत खुप मेहनत घेतली. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकून आपल्या परिवाराचचं नाव मोठं केलं नाही, तर उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरादेखील खोवला. 

      मोलमजुरी करणारे अशिक्षित आई वडिल... टीनपत्र्याचं घर... त्यात वीजेचा साधा बल्बही नाही... पावसाळ्यात घरासमोर गुडघाभर चिखल... सर्वत्र अंधार... अशा विपरित परिस्थितीत आयुष्याचा एकेक क्षण काढणाऱ्या चौहान परिवारात ज्योती जन्माला आली आणि हळूहळू दिवस पालटू लागले. ज्योतीनं गरिबीशी दोन हात करत खुप मेहनत घेतली. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकून आपल्या परिवाराचचं नाव मोठं केलं नाही, तर उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरादेखील खोवला. 
         ही संघर्षपूर्ण कहाणी आहे हिंगणा येथील पंचशिलनगर झोपडपट्‌टीत राहणाऱ्या ज्योती चौहान या गुणी धावपटूची. नागपूरपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा गावात जंगबहादूर आणि सुशिला हे पती-पत्नी राहतात. काही वर्षांपूर्वी उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून चौहान कुटूंब अलाहाबादवरुन तीनऐक दशकापूर्वी नागपुरात आलं. जंगबहादूर हे एका कंपनीत हेल्पर म्हणून तर, आई मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करू लागले. अत्यंत कठिण परिस्थितीत दिवसं रेटत असताना नशिबानेही त्यांची परीक्षाच घेतली. सुशिलाची प्रकृती बिघडल्याने दोनवेळा पोटावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे जंगबहादूर एकटेच कमाई करणारे उरले. आईवडिलांचा संघर्ष सुरू असताना एकेदिवस ज्योती मैदानावर उतरली. एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवून. तिनं प्रचंड मेहनत केली. देशभरातील ऍथलेटिक्‍स स्पर्धांमध्ये असंख्य पदकं जिंकली. राष्ट्रीय पातळीवर तिनं नागपूरी ठसा उमटविला. आता तिला साता समुद्रापारचे वेध लागलेय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्याचं तिचं स्वप्न आहे. त्या दिशेने ती मेहनत घेतेय. 
            ज्योतीचा ऍथलेटिक्‍समधील प्रवास तसा अनपेक्षितच. बालाजी हायस्कूलमध्ये शिकत असताना स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ती पहिल्यांदा धावली. तिच्या भन्नाट वेगानं शारीरिक शिक्षक प्रभावित झाले. त्यांनी तिला ऍथलेटिक्‍ससाठी प्रोत्साहित केलं. तिथूनच ज्योतीचा ऍथलेटिक्‍समधील प्रवास सुरू झाला. ज्योती दररोज हिंगण्यावरुन एकटीच सायकलने नागपूरला येते. विद्‌यापीठाच्या मैदानावरील ट्रॅकवर माजी राष्ट्रीय धावपटू रश्‍मी गुरनुलेच्या मार्गदर्शनात सकाळी व सायंकाळी सराव करते. ऊन असो वा पाऊस किंवा कुडकुडणारी थंडी. चेहऱ्यावर कुठलाही थकवा न येऊ देता ती रोज  २८ किलोमीटर अंतर कापते. २० वर्षीय ज्योतीनं आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये पन्नासावर पदके जिंकली. यात अखिल भारतीय आंतरविद्‌यापीठ स्पर्धेतील सुवर्ण, रांची नॅशनल्समधील रौप्य, गुजरातमधील पश्‍चिम विभाग स्पर्धेतील रौप्य, हैदराबाद मॅरेथॉनममधील सुवर्ण आणि गुजरात मॅरेथॉनममधील सुवर्णपदकांचा मुख्यत्वे समावेश आहे. या सर्व पदकांचा तिला सार्थ अभिमान आहे. पण, नागपुरात अलीकडे पार पडलेल्या सुराज्य दौडमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी व मोनिकाला मागे टाकत जिंकलेलं सुवर्णपदक तिच्यासाठी अविस्मरणीय आहे

         स्पर्धांच्या माध्यमातून बक्षिसापोटी मिळालेल्या रकमेमुळे ज्योतीच्या घरची परिस्थिती थोडीफार सुधारली. पण आईबाबांना अजूनही अंधारात राहावं लागतंय, याचं तिला दु:ख आहे. तिरोडा येथील सी. जे. पटेल कॉलेजमध्ये बी. ए. पार्ट वन ला असलेली ज्योती मातापित्यांसोबतच, तिची गुरू, कॉलेज आणि जिल्हा संघटनेलाही यशाची वाटेकरी मानते. या सर्वांनी "सपोर्ट' केल्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकले, असे ती आवर्जून म्हणते. आपली लाडकी लेक योग्य दिशेने धावत असल्याचा आईलाही सार्थ अभिमान आहे. "स्पोर्टस कोट्या'त तिला एखादी नोकरी मिळाली असती तर, तिचं जीवन सफल झालं असतं, अशी काळजी सध्या सुशिलाला आहे. 
  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News