दगडूचा आजवरचा प्रवास त्याच्या शब्दात...

शब्दांकन - काजल डांगे
Saturday, 15 June 2019

सगळ्यांचाच लाडका ‘दगडू’ म्हणजे अभिनेता प्रथमेश परब. एकांकिकेपासून प्रथमेशने अभिनयाला सुरुवात केली आणि आता तो चित्रपटांबरोबरच नाटकामध्येही काम करत आहे. विशेष म्हणजे ‘टकाटक’ सारख्या बोल्ड चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आजवरचा प्रवास नेमका कसा होता, हे जाणून घेऊया त्याच्याच शब्दांत...

सगळ्यांचाच लाडका ‘दगडू’ म्हणजे अभिनेता प्रथमेश परब. एकांकिकेपासून प्रथमेशने अभिनयाला सुरुवात केली आणि आता तो चित्रपटांबरोबरच नाटकामध्येही काम करत आहे. विशेष म्हणजे ‘टकाटक’ सारख्या बोल्ड चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आजवरचा प्रवास नेमका कसा होता, हे जाणून घेऊया त्याच्याच शब्दांत...

एकांकिकेपासून माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये असतानाच मला अभिनयाची गोडी लागली. बारावीनंतर मी ‘बिपी’ नावाची एकांकिका केली होती. त्या एकांकिकेवरच ‘बालक पालक’ हा चित्रपट आला. ‘बालक पालक’साठी माझे ऑडिशन घेण्यात आले आणि त्यानंतर या चित्रपटासाठी माझी निवड झाली. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला जे काम मिळत गेलं, ते काम मी प्रामाणिकपणे करत गेलो.

पण नशिबाने मलाही चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. शिवाय ‘बालक पालक’, ‘टाईमपास’, ‘उर्फी’ यांसारखे मराठी चित्रपट मला करायला मिळाले. या साऱ्या चित्रपटांनी माझे आयुष्यच बदलून टाकले. आताही मला जे काम मिळतं ते अगदी मी मन लावून करतो. मग ते नाटक असो वा चित्रपट. मी केलेला प्रत्येक नवा प्रोजेक्‍ट प्रेक्षकांना आवडणार की नाही, याचा विचार मी कधीच करत नाही. मी माझं शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. 

मी या क्षेत्रात आलो तेव्हा मनाशी एक निश्‍चय केला होता, की ग्लॅमरस दुनियेत किंवा मिळालेल्या फेममध्ये वाहून न जाता आपलं काम आपण करत राहायचं. मी सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. माझ्या कुटुंबामधीलही या क्षेत्रात कोणीच नव्हतं. पण मी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्य कुटुंबीयांचा मला संपूर्ण पाठिंबा होता. मी केलेले चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने मला खूप प्रसिद्धीही मिळाली. मला मिळालेलं यश, प्रसिद्धी माझ्या आई-बाबांनी फार जवळून अनुभवली आहे. स्वबळावर आपला मुलगा आजवर इथे पोहोचला आहे, याचा त्यांना अभिमान आहे. आजही माझे आई-बाबा नोकरी करतात. माझे बाबा तर सायकलवरून कामाला जातात. त्यांचे हे कष्ट, मेहनत, काम करण्याची जिद्द पाहून नेहमीच मी अवाक्‌ होत असतो. 

जवळपास सात ते आठ वर्षं मी या क्षेत्रामध्ये आहे. या सात-आठ वर्षांनी मला खूप काही शिकवलं. माणसं कशी जपली पाहिजेत, इतरांशी बोलण्याची पद्धत हे चार लोकांमध्ये वावरू लागल्यानंतर कळलं. कलाकार म्हणून तर मी नेहमीच काही ना काही तरी नवीन शिकत असतो आणि यापुढेही शिकत राहीन. या क्षेत्रात ग्लॅमर, फेम, प्रसिद्धी सगळं काही आहे. पण ते तुम्हाला जपून ठेवता आलं पाहिजे. 

मला इतक्‍या वर्षांनंतरही काही वाईट अनुभव येतात. माझा लूक, रंग, माझी उंची यावरून सतत मला बोललं जातं. कित्येकांनी तर हा किती काळा आहे, असं म्हणून मला हिणवलंही आहे. माझ्या शरीरयष्टीवरूनही टीका होते; पण याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष करतो. खरं तर हिरो म्हणजे उंच, घारे डोळे, पांढराशुभ्र रंग, भरभक्कम शरीरयष्टी अशी प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. माझ्याकडे यामधील काहीच नाही म्हणून मी बरंच काही ऐकलं आहे किंबहुना आजही ऐकतो. पण माझ्याकडे जे नाही आहे, ते मी घेऊन कधीच रडत बसलो नाही.

माझ्याकडे जी कला आहे ती मी प्रेक्षकांपुढे सादर केली आणि त्याचा रिझल्ट प्रेक्षकांनी पाहिला आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हतं. मी त्या काळातही आपल्याकडे काही नाही म्हणून हार मानली नाही. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पडत्या काळात खचून गेलात की पुढे काम करताना तुमचा आत्मविश्‍वास कमी होतो. आता मी चित्रपट करता करता नाटकही करत आहे. शिवाय नाटक, चित्रपटांमधून मला माझ्या मनासारखं काम करायला मिळत आहे. 

‘टकाटक’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ॲडल्ट कॉमेडी असणारा चित्रपट आहे. शिवाय बरेच बोल्ड सीन्सही या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत; पण या चित्रपटात बोल्ड कॉमेडी ओढून-ताणून आणण्यात आलेली नाही. एक सामाजिक संदेश त्याचबरोबरीने उत्तम कथा रुपेरी पडद्यावर या चित्रपटाच्या निमित्ताने येत आहे.

या चित्रपटाची गाणी, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरून बऱ्याच सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पण दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ही कथा रुपेरी पडद्यावर उत्तमरीत्या मांडली आहे. अभिजित आमकर, रितिका श्रोत्री, प्रणाली भालेरावही मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मलाही या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या चौकटीबाहेरील भूमिका करायला मिळाली.
               

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News