जेईई मेन्सची प्रश्‍नपत्रिका मराठीतून बंद; ‘एनटीए’चे स्पष्टीकरण

सकाळ (यिनबझ )
Saturday, 9 November 2019

अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जॉइंट एंट्रन्स टेस्ट (जेईई) मेन्स या परीक्षेसाठी मराठीसह ऊर्दू भाषेतून प्रश्‍नपत्रिकेचे भाषांतर बंद करण्यात आले आहे.

नाशिक : अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जॉइंट एंट्रन्स टेस्ट (जेईई) मेन्स या परीक्षेसाठी मराठीसह ऊर्दू भाषेतून प्रश्‍नपत्रिकेचे भाषांतर बंद करण्यात आले आहे. गुजरातच्या विनंतीनुसार मात्र गुजराती भाषेतून जेईई मेन्स परीक्षेची अनुवादित प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए)ने स्पष्ट केले आहे.

एनटीएने या संदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. जेईई मेन्स परीक्षा २०१३ पासून सुरू झाली होती. सर्व राज्यांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स ही प्रवेशप्रक्रिया असेल, असा या मागील उद्देश होता. या संदर्भात २०१३ मध्येच गुजरातने तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सहमती दर्शवली होती व प्रश्‍नपत्रिका गुजराती भाषेत उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. यानंतर २०१४ मध्ये महाराष्ट्रानेही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत जेईई मेन्सच्या माध्यमातून प्रवेश देण्याचे मान्य केले होते.

महाराष्ट्रातर्फे मराठी व ऊर्दू भाषेतून प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. कालांतराने २०१६ मध्ये महाराष्ट्रासह गुजरातने जेईई मेन्सच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, गुजरातने जेईई मेन्सची प्रश्‍नपत्रिका गुजराती भाषेत उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली होती. अन्य कुठल्याही राज्याने भारतीय राष्ट्रीय भाषेत जेईई मेन्सची प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात ‘एनटीए’शी संपर्क साधला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून जेईई परीक्षांचे संयोजन केले जात  असते. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, गेल्या वर्षापासून वर्षातून दोनदा जेईई मेन्स परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेशासाठी ६ ते ११ जानेवारी २०२० या कालावधीत संगणकावर आधारित जेईई मेन्स परीक्षा होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News