जालनेकरांनी ठरवलं 'हीच ती वेळ' होती?

आकाश गायकवाड
Monday, 28 October 2019

जालना : राज्यात महायुतीला जनतेने कौल दिला असला तरी राज्यमंत्री असेलेले अर्जुन खोतकर यांना मतदारांनी चांगलाच 'हात' दाखवत काँग्रेसच्या गोरंट्याल यांना आमदार पदी विराजमान केले. महाराष्ट्रात तशी जालन्याची ओळख 'स्टील अँड सीड्स सिटी ऑफ जालना' अशी आहे. 

जालना : राज्यात महायुतीला जनतेने कौल दिला असला तरी राज्यमंत्री असेलेले अर्जुन खोतकर यांना मतदारांनी चांगलाच 'हात' दाखवत काँग्रेसच्या गोरंट्याल यांना आमदार पदी विराजमान केले. महाराष्ट्रात तशी जालन्याची ओळख 'स्टील अँड सीड्स सिटी ऑफ जालना' अशी आहे. 

बद्रीनारायण बारवाले यांच्या बीज क्रांतीमुळे सातासमुद्रापार जालना ओळखला जातो. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्या राजकीय संघर्षामुळे जालना जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला. खोतकर यांनी लोकसभेची कसून तयारी केल्यानंतर राजकीय आखाड्यात मुख्यमंत्र्याच्या मध्यस्तीने साटं-लोटं करून माघार घेतली आणि तिथेच लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनेला ठेच लागली. आपल्या नेत्याला दिल्लीत पाठवायचं हे जालनेकरांच ठरलं होतं, परंतु जनतेचा अपेक्षा भंग झाल्या आणि कदाचित त्यांनी ही ठरवलं 'हीच ती वेळ' आता 'हाताला' साथ द्या?

महाराष्ट्र केसरी कुस्ती, भीम महोत्सव, पशु एक्स्पो अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून खोतकरांनी आपला जनसंपर्क वाढवला परंतु लोकसभेला पक्षाचा आदेश मानत त्यांनी माघार घेतली. युतीचा धर्म स्विकारत रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी पणे उभे राहून त्यांना चौथ्यांदा लोकसभेत पाठवले. रावसाहेब दानवे यांच्या विजयाची वाट सुकर झाली असली तरी खोतकरांच्या वाटेत काटेरी झुडपे वाढली होती. ग्रामीण भागातील हक्काचा मतदार दुरावला गेला. व्यापारी वर्गाला फुले मार्केटचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने ते ही नाराज झाले. 

२०१४ ला धर्मनिरपेक्ष मतांचे होणारे विभाजन यंदा झाले नाही. शहरात विकासाची कामे न झाल्याने मतदार देखील दुरावला गेला. सोबतच काही प्रमाणात युतीचा धर्म पाळला नसल्याची चर्चादेखील लोकांमध्ये दिसून आली. याच कारणांमुळे खोतकर विजयापासून दूर राहिले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले खोतकर आणि गोरंट्याल महाराष्ट्राच्या राजकारणात पंचवीस वर्षांपासून आमने सामने आहेत. सन १९९५ पासून ते २०१९ पर्यंत खोतकर आणि गोरंट्याल यांनी तीन - तीन वेळेस जालन्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्ह्याचे राजकारण सर्वसामान्याला न समजणारेच आहे. उघडपणे एकमेकांना विरोध करणारे नेते कधी कोणासोबत कशी सेटिंग करतील याचा काही नेम नाही. 

अनेक वेळा जालनेकरांना याची प्रचिती आली आहे. जिल्हापरिषद असो की नगरपरिषद वाटा घाटी करूनच सर्वच पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी कसरत केली आहे. तुम्ही आम्हाला लोकसभेला मदत करा आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करू हीच रणनीती राहिलेली आहे. राजकारणातले विरोधक सत्तेसाठी काहीही करू शकतात. 

२०१४ ला थोड्या फरकाने विजयापासून दूर राहिलेल्या काँग्रेसच्या गोरंट्याल यांच्यासाठी यंदा पोषक वातावरण होते. तहानलेल्या जालणेकरांना पाणी देण्याचे काम असो की स्वच्छता असो नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला खुश करण्याचे प्रयत्न केले होते. 

शरातील नागरिक सोबत होतेच मात्र नाराज व्यापारी, ग्रामीण भागातील मतदारांची नस ओळखून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात गोरंट्याल यशस्वी झाले. त्यामुळेच सत्तावीस हजाराच्या मताधिक्याने ते निवडून देखील आले. नवनियुक्त आमदार गोरंट्याल यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. येणाऱ्या काळात ते जालनेकरांना न्याय देत मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरवतील हीच सर्वांची अपेक्षा आहे. 

घनसावंगीत यंदा चूरशीची लढत 
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असेलला घनसावंगी मतदार संघात यंदा शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी राजेश टोपे यांना कडवी झुंज दिली. 

२०१४ मधे मोदी लाटेत सुद्धा चाळीस हजाराच्या फरकाने विजयी झालेल्या टोपेंना यंदा मात्र सुरवातीच्या कलांमध्ये चांगलाच घाम फुटला होता. परंतु गोदाकाठच्या गावांनी आब राखल्यामुळे विजयाची वाट सुकर झाली. शरद पवारांच्या झंझावाती सभेचा काही अंशी परिणाम झाला.  सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सूतगिरणी याच्या माध्यमातून मतदारसंघाशी नाळ जोडलेल्या टोपेंना यंदाची निवडणूक जरा अवघडच गेली. मतदार संघातील वर्षानुवर्षे असलेले प्रश्न आजही तसेच आहे. शरद पवारांचा करिष्मा आणि गोदाकाठच्या गावांनी यंदा तरी टोपेंना तारले. परंतु येणाऱ्या काळात विकासाची गंगा मतदार संघात वाहील हीच अपेक्षा ठेवत मतदारांनी पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी टोपेंना दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News