जलील खासदार झाले, भाजप-शिवसेना व ‘एमआयएम’चे नगरसेवक भिडले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • खासदारांच्या अभिनंदनावरून हमरीतुमरी; ‘एमआयएम’च्या २० नगरसेवकांचे पद रद्द 

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. भाजप-शिवसेना व ‘एमआयएम’चे नगरसेवक समोरासमोर आल्यामुळे सुमारे साडेतीन तास एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या सभागृहाला आखाड्याचे रूप आले. पोलिसांना पाचारण करून एमआयएमच्या नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले व कामकाज सुरू झाले. 

सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी महापालिकेने खासदार इम्तियाज जलील यांना डावलले होते. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौर व महापालिकेच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले. आजच्या सर्वसाधारण सभेतदेखील याचे पडसाद उमटले. सभेला सुरवात होताच विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला; मात्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे विरोधी पक्षाचे नगरसेवक अभिनंदनाच्या ठरावावरून आक्रमक झाले; तर दुसरीकडे भाजप नगरसेवक पाण्यावरून आक्रमक झाले. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला.

भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. ठिय्या देणाऱ्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व महापौरांनी एका दिवसासाठी रद्द केले. या कारवाईनंतर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांमध्ये घोषणाबाजी झाली. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब करीत पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी  एमआयएमच्या २० नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढले. अनेकांना पोलिसांनी उचलून नेले, तर महिला नगरसेविका स्वतःहून बाहेर पडल्या. 
 

कायमस्वरूपी प्रवेश न देण्याचा ठराव 
एमआयएमच्या वीस नगरसेवकांचे पद रद्द करावे, त्यांना सर्वसाधारण सभेत प्रवेशास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असा ठराव भाजपचे उपमहापौर विजय औताडे व अन्य नेत्यांनी मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. २० नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News