पावसाळा आला की हीचं मंडळी मदतीसाठी सदैव तयार

ज्योत्स्ना गाडगीळ
Monday, 1 July 2019

शाळेत असताना अशी ऑफिशिअल सूचना घेऊन येणारा मामा देवदूत वाटायचा. रटाळ चाललेल्या विज्ञानाच्या नाहीतर गणिताच्या तासात मामाची एंट्री झाली, की आनंदाचं समीकरण आपोआप जुळून येई. शिक्षक सूचना पत्रकावर स्वाक्षरी करेपर्यंत, रिऍलिटी शोजचा निकाल लागण्यापूर्वीची शांतता वर्गात पसरलेली असे. मामा मिस्कील डोळ्यांनी वर्गाकडे बघायचा, तेव्हा त्याच्या नजरेतून सूचनेतल्या मजकुराची कल्पना यायची. शेवटच्या बाकांवरून तर दप्तर भरल्याचे आवाजही सुरू व्हायचे.

काल सायंकाळपासून पावसानं जोर धरलाय आणि आता तर भर दिवसा काळोख केलाय. पावसाचे कमी-जास्त होणारे प्रमाण पाहता ऑफिसमध्ये एका वरिष्ठांनी सांगितलं, 'न्यूजवर लक्ष ठेव आणि तसंच काही वाटलं, तर थोडी लवकर निघ, दूर राहतेस!' त्यांच्या बोलण्यात काळजीचा सूर होता. ऐकताना मनापासून आनंद झाला, तरी तो चेहऱ्यावर दिसणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेतली.

शाळेत असताना अशी ऑफिशिअल सूचना घेऊन येणारा मामा देवदूत वाटायचा. रटाळ चाललेल्या विज्ञानाच्या नाहीतर गणिताच्या तासात मामाची एंट्री झाली, की आनंदाचं समीकरण आपोआप जुळून येई. शिक्षक सूचना पत्रकावर स्वाक्षरी करेपर्यंत, रिऍलिटी शोजचा निकाल लागण्यापूर्वीची शांतता वर्गात पसरलेली असे.

मामा मिस्कील डोळ्यांनी वर्गाकडे बघायचा, तेव्हा त्याच्या नजरेतून सूचनेतल्या मजकुराची कल्पना यायची. शेवटच्या बाकांवरून तर दप्तर भरल्याचे आवाजही सुरू व्हायचे. आमच्या नजरेतला आनंद ओळखून शिक्षकही टप्प्याटप्प्याने सूचना वाचून दाखवायचे. त्यावर आमचं कल्ला करून शिक्कामोर्तब व्हायचं. मामा पाठोपाठ मुख्याध्यापकांची फेरी असल्यामुळे शिक्षक हातातला खडू मारून दंगेखोरांना गप्प बसवायचे. तोंडं बंद झाली, तरी वह्या-पुस्तकं ठेवताना दप्तरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या चुरल्याचा एकच आवाज व्हायचा.

फळ्यावरचा मजकूर पुसून शिक्षक तिसरी बेल होण्याची वाट बघत खुर्चीवर बसायचे. 'पुढचं प्रकरण उद्या वाचूनया' वगैरे शिक्षकांनी दिलेल्या सूचना आनंदाच्या डोहात विरून जायच्या. राष्ट्रगीत होईपर्यंत कोणाची मान खिडकीबाहेर, कोणाची वर्गाबाहेर, कोणाची गप्पांच्या फडात, तर कोणाची खाऊच्या डब्यात अडकलेली असायची. मधल्या सुटीआधी मिळालेल्या सुटीमुळे खाऊचे डबे अर्धवट कोरले जायचे. गाण्यांची जोड नसतांनाही बाकावर ताल धरणे, पाचकळ विनोदावर हास्याची कारंजी उडवणे आणि राष्ट्रगीताची आतुरतेने वाट पाहणे, असा कार्यक्रम ठरलेला असे.

त्यावेळी मोबाईल नसूनही सांगोपांगी निरोपातून पालक मुलांना घ्यायला शाळेच्या आवारात गर्दी करायचे. राष्ट्रगीत झाले, की आधी प्राथमिक मग माध्यमिक इयत्तेचे वर्ग रांगेने सोडले जायचे. ज्यांचे पालक आले नाहीत, त्यांना थांबवून ठेवले जाई, तर जे पालक आपल्या पाल्याव्यतिरिक्त जवळ राहणाऱ्या मुलांची जबाबदारी घेत त्यांना मोकळे केले जाई.

जनावरं मोकाट सुटावी, तशी शाळेच्या गेटबाहेर मुलांची गर्दी असायची. अशा गर्दीतून मुलं आपल्या पालकांना आणि पालक आपल्या मुलांना हुडकून काढत मिठ्या मारायची. जिवा-शिवाची भेट झाली की अर्ध्याहून अधिक गर्दी ओसरायची. चिखलाच्या पाऊलखुणांनी शाळेचं पटांगण चिखलमय होई. शेवटचा विद्यार्थी जाईपर्यंत शिक्षक आणि मामा शाळेत खोळंबून असत.

'सगळे गेले आणि आपणच राहिलो', ह्या भावनेने पावसाचं अर्ध्याहून अधिक पाणी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जमा होई. शिक्षक मायेने डोक्यावरून हात फिरवत विद्यार्थ्यांना दिलासा देत. 'आई न्यायला येईल', 'बाबा कुठेतरी अडकले असतील', 'कोणी नाही आलं तर मी येईन घरी सोडायला' असे शब्द कानावर पडले की मनगटांनी अश्रूंना वाट करून दिली जाई. करता-पाहता शेवटचा विद्यार्थी पालकांच्या स्वाधीन केला की शिक्षक त्यांच्या जबाबदारीतून मोकळे होत आणि आपल्या घराची वाट धरत.

असा हा 'अर्धी सुटी'चा आनंद मनात 'पूर्ण' घर करून गेला. हाफ डे, सीएल, पीएल, एसएल टाकताना जो आनंद होत नाही, तो आनंद मामाच्या सूचना पत्रकात दडलेला होता. वाटतं... पुन्हा एकदा मामाची एंट्री व्हावी, शिक्षकांनी नोटीस वाचावी, दप्तर भरावं आणि आईचा हात धरून घराची वाट धरत अर्धी सुटी एन्जॉय करावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News