बहुमत सिद्ध ! कर्नाटकात 'कमळ' फुललं..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

"मी सूडाचे राजकारण करणार नाही. आम्ही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करू. त्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे."

- बी. एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री

बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकारच्या पतनानंतर मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेल्या भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. आघाडीने मागणी न केल्याने ठरावावर थेट मतदान घेण्यात आले नाही. त्यामुळे, राज्यात तब्बल सहा वर्षांनंतर भाजपच्या हाती राज्याच्या सत्तेची चावी आली आहे.

एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीस आघाडी सरकारने मंगळवारी १०५ विरुद्ध ९९ मतांनी विश्‍वास गमावला होता. त्यानंतर कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यांना ११३ चा जादुई आकडा गाठायचा होता. बहुमत सिद्ध करणे फारसे अवघड नसले तरी सहजासहजी शक्‍यही नव्हते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी तिघा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्याने विधानसभेची सदस्यसंख्या २२१ वर पोचली. त्यामुळे, बहुमताचा आकडाही घसरला.

हा निर्णय भाजपसाठी सुखावह होता. मात्र, अध्यक्षांनी रविवारी आणखी १४ आमदारांना अपात्र ठरविल्याने संख्याबळ २०७ वर पोचले. तसेच काँग्रेस व जेडीएसची सदस्यसंख्याही कमी झाली. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदारांची गरज होती. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार व एका अपक्षासह १०६ संख्याबळ असल्याने येडियुरप्पांचा मार्ग मोकळा झाला होता. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News