अशी होतेय, देशांतर्गत व्यापारी युद्धामुळे पडझड!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

अमेरिकी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे व्यापारी युद्धाला नव्याने तोंड फुटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मुंबई- अमेरिकी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे व्यापारी युद्धाला नव्याने तोंड फुटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. याचे जोरदार पडसाद सोमवारी शेअर बाजारात उमटले. चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४९१ अंशांनी घसरून ३८,९६० अंशांवर स्थिरावला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १५१ अंशांची घट होत तो ११,६७२ अंशांवर बंद झाला.

तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यामुळे मध्य-पूर्व भागात निर्माण झालेला तणाव, रुपयातील घसरण तसेच मान्सूनची प्रगती, यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अशात भारताने अमेरिकी उत्पादनांवर लागू केलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. त्यांच्याकडून विक्रीचा मारा सुरू असल्याने निर्देशांकात आज सलग चौथ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्‍स मंचावर टाटा स्टीलचा शेअर सर्वाधिक ५ टक्‍क्‍यांनी कोसळला.

त्यापाठोपाठ वेदांता, टाटा मोटर्स, ॲक्‍सिस बॅंक, भारती एअरटेल, रिलायन्स, ओएनजीसी, सन फार्मा, मारुती आदी शेअर ३.३३ टक्‍क्‍यांनी घसरून बंद झाले; तर येस बॅंक, कोल इंडिया, इन्फोसिस आदी शेअर वधारले. धातू व ऊर्जा या क्षेत्रीय निर्देशांकात अनुक्रमे ३ व २ टक्‍क्‍यांनी घट झाली.
दरम्यान, आशिया व युरोपातील भांडवली बाजारांमध्ये आज तेजी दिसून आली. चलन बाजारात रुपया आज डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी घसरून ६९.९१ वर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत रुपयात ५४ पैशांचे अवमूल्यन झाले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेल स्वस्त झाल्याने रुपयातील पडझड आटोक्‍यात राहिल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

दोन लाख कोटींचा फटका
शेअर बाजारात आज झालेल्या पडझडीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. त्यांनी दोन लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम आज गमावली. शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज दोन लाख कोटी रुपयांनी घसरून एक कोटी ५० लाख नऊ हजार ३२९ कोटींवर आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News