वीटभट्टीचालकाचा मुलगा बनला आयटी उद्योजक

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 5 August 2019
  • शिक्षण, अनुभव, कौशल्याच्या जोरावर सुभाषकडून कन्स्ट्रक्‍शन कंपनी सुरू 

सोलापूर: येथील वीटभट्टीचालक विश्‍वनाथ चौगुले... पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार... आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती जेमतेम... मोठा मुलगा सुभाष दहावीनंतर वडिलांना वीटभट्टी कामात मदत करत होता... बारावीनंतर सुभाषची शिक्षणाची आवड पाहून पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या वडिलांनी त्याला खासगी संस्थेत सॉफ्टवेअर डिप्लोमा कोर्स करू दिला... डिप्लोमानंतर सुभाषने नोकरीसाठी पायपीट केली... 

पुणे येथे नोकरी करत एक सॉफ्टवेअर विकसित केले... ते यशस्वी झाल्यानंतर मागे वळून न पाहता पुणे येथे सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सांभाळत सोलापुरात स्वत:ची आयटी कंपनी सुरू केली. 

विश्‍वनाथ चौगुले यांचा वडिलोपार्जित वीटभट्टी व्यवसाय आहे. आज त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी आहेत. सोबत वडिलोपार्जित वीटभट्टी व्यवसायही पाहतात. त्यांच्यापैकी सुभाष हे सोलापुरातील आयटी कंपनी स्वत: हाताळतात. कंपनीत तीन-चार कर्मचारी कार्यरत आहेत. सोबत दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला कन्स्ट्रक्‍शन उद्योगही वडील व सुभाष सांभाळतात. 

वडिलांचा वीटभट्टी व्यवसाय सांभाळत 2002 मध्ये सुभाष बारावी उत्तीर्ण झाले. जेव्हा शिक्षण घेत होते, तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. वीटभट्टीची कामे व शिक्षण अशी कसरत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च केले. जिद्द बाळगून 2005 मध्ये सॉफ्टवेअर डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. 2006 मध्ये पुणे येथील आयटी कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले. 2007 पासून पुणे येथे नोकरी करत तीन-चार कंपन्या बदलल्या. त्यात अनुभव मिळाला. 

एका मित्राने सॉफ्टवेअर बनवून देण्यास सांगितल्यानंतर तीन महिन्यांनी पहिला सॉफ्टवेअर बनवून दिला. त्यानंतर स्वत: तयार केलेला सॉफ्टवेअर कोणीतरी वापरत आहे व तो उत्तमरीत्या कार्य करीत आहे, हे लक्षात आल्याने शिक्षण व अनुभवाचा उपयोग करिअरसाठी करून घेतला. सोलापुरात 2011 पासून सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. त्यात हॉस्पिटलसाठी सॉफ्टवेअर बनवले. याला सोलापूर, पुणे, मुंबईसह गुजरात, राजस्थान, आसाम, कर्नाटकमध्ये मागणी आहे. 

सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये 
हॉस्पिटलमध्ये रुग्ण प्रवेश केल्यापासून ओपीडी व आयपीडीपर्यंत रुग्ण आला, त्याला ज्या डॉक्‍टरांना दाखवायचे त्याची एंट्री होऊन त्याने कुठल्या प्रकारचे इलाज करवून घेतले, एक्‍स- रे, पॅथॉलॉजी, त्याचे चार्जेस, बिलिंग, रिपोर्ट जनरेट होतात. हॉस्पिटलचे उत्पन्न व खर्च आदींचा डेटा मिळतो.

"जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. जे शिकलं त्यातच करिअर करायचे उद्दिष्ट ठेवून यश गाठले. स्वत:चं कौशल्य वापरत यश मिळवले. नसते तर वीटभट्टीमध्येच करिअर करावे लागले असते. सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या जोडीला वीटभट्टी चालवताना कन्स्ट्रक्‍शनची माहिती मिळवून कन्स्ट्रक्‍शन कंपनीही थाटली. कौशल्याचा योग्य वापर करून तरुणांनी अपेक्षित ध्येय गाठावे." 
- सुभाष चौगुले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News