भूदान घोटाळ्याची चौकशी करा: खासदार रामदास तडस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानची असून त्यातील ११८ हेक्टर जमीनीचे अद्याप वाटप झालेले नाही.
  • भूदानातील शेतजमीनीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली

वर्धा: जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानची असून त्यातील ११८ हेक्टर जमीनीचे अद्याप वाटप झालेले नाही. याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करत भूदानातील शेतजमीनीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. 
 
अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमीनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्थांना वितरित झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमीनी गरजूंना वाटण्यात आल्यात. परंतु शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्यामुळे या जमीनी तशाच पडून होत्या. 

शिल्लक असलेल्या जमीनी अधिकारी, भुमाफिया व शैक्षणिक संस्थेच्या संगनमताने श्रीमंत बिल्डरांना व संस्थांना  विकण्यात आल्या आहे. सर्व भूदानातील जमीनी देशातील भूमीहिन असलेल्या गोरगरिबांना तसेच सरकारी कार्याकरिता मिळण्यात यावी, याकरिता खासदार रामदास तडस यांनी शेतजमिनिमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी  लोकसभेत शून्य प्रहारअंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले.

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ७ मार्च व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली आजच्या तेलगांणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्यानी आपल्या जमीनीचा काही हिस्सा भूमीहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. 

सर्व राज्यांत त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी ४० हजार मेल पायदळ यात्रा करून २२. ९० लाख जमीन भुदानामध्ये संग्रहीत करण्यात आली, जे ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमीनीतून देशातील १६.६६ लाख एकर जमीन त्यांनी भूमीहीनांना दिली. या जमीनीपैकी ६.२७ लाख एकर जमीन संस्थांकडे शिल्लक राहिली. भूदानमधिल शिल्लक असलेल्या जमीनी अधिकारी, भूमाफीया व शैक्षणिक संस्थांच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी गृहमंत्री यांच्याकडे लोकसभेत शून्य प्रहरात केली.
      
आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून गोरगरीबाला जमीन मिळावी, याकरिता प्रयत्न केले. परंतु त्यांनी केलेल्या या कार्याला अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांनी भ्रष्टाचार करून स्वतःच्या फायद्याकरिता जमीनीचा उपयोग करीत होते. भूदान भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यास अनेक प्रकरण बाहेर येऊन भूदानमधील जमीन गोरगरिबांना मिळेल, व सरकारी कामाकरिता त्याचा उपयोग होईल, असा विश्वास यावेळी खासदार रादास तडस यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News