प्रथमच "या" जिल्ह्यात साहित्य संमेलन होणार; कार्यक्रम स्थळाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्ह्याला मिळण्याचे संकेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले आहेत.

उस्मानाबाद : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्ह्याला मिळण्याचे संकेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले आहेत. संमेलनाच्या समितीने शहरातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ठाले- पाटील बोलत होते.

त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्याला संमेलनाचा मान मिळणार आहे. ९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यजमान पदासाठी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. 

महामंडळाच्या समितीने नाशिक येथे जावून स्थळ पाहणी केली. बुधवारी (ता. १६) समिती उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आली होती. यामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्षा विद्याताई देवधर, कोशाध्यक्ष रामचंद्र काळुखे, सदस्या प्रतिभाताई सराफ, प्रदिप दाते, प्रकाश पायगुडे, किरण सगर, कुंडलिकराव आतकरे, भालचंद्र शिंदे यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली.

त्यानंतर शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगारध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक आर. राजा स्वामी, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आदींसह मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे पदाधिकारी, शहरातील ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील म्हणाले की, "उस्मानाबाद शहरातील कार्यक्रम स्थळाची पाहणी झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक क्षेत्रातील मंडळी संमेलनासाठी इच्छुक आहे. शिवाय त्यांच्यात सर्वच बाबतीत एकत्रीतपणा पाहायला मिळत आहे.

उस्मानाबादकरांची निराशा होऊ देणार नाही. महामंडळाच्या तुमच्यामागे शुभेच्छा असल्याचे सांगत यजमानपद देण्याचे संकेत दिले आहेत". त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उस्मानाबादला साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News