शिक्षण विभागातर्फे महाविद्यालयांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • मुंबई, पुणेच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका भागातही अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • मात्र, मनासारखे महाविद्यालय न मिळाल्यामुळे तसेच नियमित कॉलेजला न जाता फक्त परीक्षा देता यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात प्रवेश घेतल्याचे आढळून आले आहे.

औरंगाबाद - मुंबई, पुणेच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका भागातही अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, मनासारखे महाविद्यालय न मिळाल्यामुळे तसेच नियमित कॉलेजला न जाता फक्त परीक्षा देता यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात प्रवेश घेतल्याचे आढळून आले आहे. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 

सध्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढली असून, पुणे-मुंबईचे विद्यार्थीदेखील ग्रामीण भागात प्रवेश घेत असल्याच्या तक्रारी शहरातील अनेक नामवंत महाविद्यालयांनी केल्या होत्या. मात्र, ग्रामीण भागातील किती महाविद्यालयांनी अतिरिक्त प्रवेश दिलेत याची माहिती शिक्षण विभागाकडे नाही. दरम्यान, शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यात ४४ तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागातर्फे २०१९-२०साठी महाविद्यालयांची तपासणी व प्रवेशावरही नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी आज अंतिम मुदत

अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी (ता.२२) दुपारी जाहीर करण्यात आली. त्यात तीन हजार ५२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. गुरुवारी (ता.२५) प्रवेशाची अंतिम मुदत आहे. 

यंदा प्रवेशासाठी ११० महाविद्यालयांत २९ हजार १०० एवढी प्रवेशक्षमता आहे. प्रवेशासाठी १७ हजार १५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासाठी चार जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. पहिली गुणवत्ता यादी १२ जुलैला जाहीर झाली. यात ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. त्यात सात हजार ४६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला जाहीर करण्यात आली. 

असे असेल भरारी पथक 
विभागीय शिक्षण उपसंचालक व्ही. के. खांडके यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांचे पथक असेल. यात यू. जे. करवंदे, के. एम. सावंत केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती सदस्य, मोहत्तशीम अली खान (मौलाना आझाद कनिष्ठ महाविद्यालय), बी. बी. चव्हाण (माध्यमिक शिक्षणाधिकारी) सदस्य आहेत. शासनाच्या नियमानुसार प्रवेश होताहेत का? याबाबतची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल शासनाला पाठविण्यात येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News