मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळांची घुसखोरी

मिलिंद देसाई
Saturday, 14 September 2019
  • काही कन्नड शाळांच्या इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे सहा महिण्यांसाठी मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरु करण्याची परवानगी द्या असे सांगत शिक्षण खात्याने मराठी शाळांमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव : काही कन्नड शाळांच्या इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे सहा महिण्यांसाठी मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरु करण्याची परवानगी द्या असे सांगत शिक्षण खात्याने मराठी शाळांमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळा सुरु करण्यात आल्याबाबत मराठी भाषिकांना माहिती दिल्यास दुर्गम भागात बदली करण्याची धमकी शिक्षण खात्यातील अधिकारी शिक्षकांना देत आहेत. तसेच काही दिवसांपुर्वी फुलबाग गल्ली येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 7 च्या इमारतीत कन्नड शाळेचे वर्ग सुरु करण्यात आल्याने मराठी शाळांच्या इमारतीवर शिक्षण खात्याचा डोळा असल्याचे चित्र दिसुन येत आहे. बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुका आदी भागात मराठी शाळांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. तसेच विद्यार्थ्यांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. 

तरीही दरवेळी मराठी शाळांबाबत प्रशासनाकडुन दुजाभाव केला जात असतो. याबाबत मराठी भाषिकांमधुन नेहमीच नाराजी व्यक्‍त होत असते. गेल्या काही महिण्यांपासुन शहरातील चांगल्या स्थितीत असलेल्या मराठी शाळांच्या इमारतींकडे शिक्षण खात्याचे लक्ष जात असुन कन्नड शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे, इमारत धोकादायक बनली आहे, शाळेसाठी भाडोत्री इमारत उपलब्ध होत नाही. अशी कारणे देऊन फक्‍त दोन महिणे किंवा चार महिणे मराठी शाळेत कन्नड शाळा भरविण्यात येईल असे सांगुन शाळा स्थलांतरीत करण्यास येत आहे. मात्र शाळेचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर मराठी शाळेचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फुलबाग गल्ली येथील कन्नड शाळेच्या इमारतीला गळती लागल्याचे सांगत वर्षभरापासुन मराठी शाळेत कन्नड शाळा स्थलांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला मराठी भाषिकांनी पुर्णपणे विरोध केला होता. 

त्यामुळे मराठी शाळेतील शिक्षकांना कोणालाही सांगु नका नाहीतर बदली होइल असे सांगत शाळेचे मराठी शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. तर वडगाव येथे स्वांतत्रपुर्ण काळात सुरु झालेल्या सरकारी मराठी शाळा क्रमांक पाचच्या इमारतीमध्ये गेल्या वर्षी फक्‍त दोन महिने कन्नड शाळा सुरु करण्यात येईल, असे सांगत कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र अजुनही कन्नड शाळेसाठी दुसरी इमारत शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे काही तरी कारण सांगायचे आणि मराठी शाळेत घुसकोरी करायचा प्रयत्न शिक्षण खात्याकडुन सुरु आहे. याबाबत वेळीच आवाज उठविने आवश्‍यक आहे. अन्यथा यापुढील काळातही मराठी शाळांत कन्नड शाळा सुरु करण्याचा प्रयत्न होतच राहणार आहे. 

फुलबाग गल्ली येथील कन्नड शाळेचे मराठी शाळेत स्थलांतर करण्याचा प्रयत्न यापुर्वी करण्यात आला होता. त्यावेळी पुर्णपणे विरोध करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपुर्वी परिसरातील नागरीक व पालक यांना विश्‍वासात न घेता कन्नड शाळा सुरु करण्यात आली आहे. या प्रकारे मराठी शाळांचे कानडीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असुन याबाबत आवाज उठविला जाणार आहे. 

- सुनिल बाळेकुंद्री, माजी नगरसेवक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News