#indvspak - भारताची सप्तपदी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकवर सातवा विजय
  • रोहित शर्माची      शतकी खेळी
  • चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अपयशाची परतफेड

मॅंचेस्टर - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सर्वांत हाय व्होल्टेज सामना समजल्या जाणाऱ्या सामन्यात रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा फ्यूजच काढून टाकला. एकतर्फी विजय मिळवत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासातील विजयाची परंपरा कायम ठेवत सातवा विजय मिळवला.

दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पाककडून पराभूत झाला होता. त्या अपयशाची सव्याज परतफेड विराट कोहलीच्या टीम इंडियाने केली. रोहित शर्माचे तडाखेबंद शतक, स्वतः विराटची ७७ धावांची खेळी, त्यामुळे ३३६ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. भारतीय डावाच्या अंतिम टप्प्यापासून पावसाचा व्यत्यय येण्यास सुरुवात झाली, त्यामुळे आपली लय बिघडणार नाही, याची काळजी भारतीय संघाने घेतली.

दोन षटकांची गोलंदाजी करून प्रमुख गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार मांडीच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाद झाला, पण त्याची उणीव भासू न देणारी कामगिरी इतर गोलंदाजांनी केली आणि आपली कणखरता दाखवली. हार्दिक पंड्या आणि वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर यश मिळवणारा विजय शंकर या बदली गोलंदाजांनी दोन दोन विकेट मिळवले, परंतु त्याधी कुलदीप यादवची भेदक फिरकी विजयाचा मार्ग खुला करणारी ठरली. त्याने पाकचे धोकादायक फखर झमान आणि बाबर आझम यांना बाद केले. पाकचा डाव सावरणारे हे फलंदाज बाद झाल्यावर त्यांच्या इतर फलंदाजांनी पांढर निशाण फडकावले.

तत्पूर्वी सकाळी रोहित शर्माने भारताच्या वर्चस्वाचा भक्कम पाया उभा केला. के. एल. राहुलसह १३६ धावांची सलामी देत स्वतः ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. यंदाच्या स्पर्धेतले हे त्याचे दुसरे शतक आहे. रोहितनंतर विराट कोहलीने 
७७ धावा फटकावल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News