#indvs - पावसाऐवजी धावांचाच वर्षाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • रोहितच्या वादळानंतर कोहलीचा तडाखा; पाक फलंदाजांची शरणागती

मॅंचेस्टर - भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्ययच निर्णायक ठरणार अशी चर्चा असताना रोहित शर्माचे वादळच पाकिस्तानवर धडकले. त्यापाठोपाठ विराट कोहली आणि सहकारीही पाकिस्तानवर बरसले; मात्र फलंदाजीचे नंदनवन गोलंदाजीस अनुकूल करण्याच्या पाकच्या चाली फसल्या आणि त्यांना धावांच्या दुष्काळास सामोरे जावे लागले. भारतीयांनी स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवताना ८९ धावांनी बाजी मारली.

गोलंदाजीची वाढती ताकद भारतीय फलंदाजीचा दबदबा जास्तच वाढवते याचीच प्रचीती आली. एका वर्षापूर्वी महम्मद आमीरसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती, पण तो इतिहास झाला आहे हेच वारंवार सिद्ध झाले. भारतीय धावांच्या वर्षावाने खच्ची झालेल्या पाक फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचा फायदाही घेता आला नाही.
महम्मद आमीरने खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न केला, पण त्यापासून रोहित शर्माने प्रेरणा घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डावाच्या उभारणीस महत्त्व देणाऱ्या रोहित शर्माने प्रतिहल्ला केला. रोहितने भारतीय धावगतीस दिलेली गती कधीही कमी होणार नाही याची काळजी भारतीय फलंदाजांनी घेतली.

भारतीय डाव संपताना आलेल्या पावसामुळे आता आपली फलंदाजी सुरू होणार ही पाकिस्तानची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताचाच डाव सुरू राहिला आणि कदाचित त्यामुळेच पाक फलंदाजांचे लक्ष्य विचलित झाले. भुवनेश्‍वर कुमार जखमी झाल्यावर त्यांनी बदली गोलंदाज विजय शंकरला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात सलामीची विकेट गमावली. बाबर आझम आणि फखार झमान यांनी शतकी भागीदारी भारतास सतावू लागली होती; मात्र त्यांनी भारतीयांवर पुरेसे दडपण आणले नव्हते. आवश्‍यक धावगती सातत्याने वाढत होती; मात्र दोघांनाही कुलदीप यादवच्या फिरकीने चकवले. झपकन आत आलेल्या चेंडूवर बाबर चकला होता.

हे समोरून बघणाऱ्या फखारने त्याच टप्प्यात पडलेल्या चेंडूला स्वीप करण्याचा निष्कारण प्रयत्न केला. त्यानंतर पाक फलंदाजांत बाद होण्यासाठी जणू स्पर्धा झाली. आपल्या रूपाने भारतास नवा कपिल गवसला हे तज्ज्ञांचे मत जणू योग्य असल्याचे दाखवताना हार्दिक पंड्याने महम्मद हफीझ आणि शोएब मलिकला टिपले. विजय शंकरने सर्फराजला चकवल्यावर भारताचा विजय किती धावांनी, ही औपचारिकताच राहिली.

लक्षवेधक

  • रोहितने विश्वकरंडकातील भारतीय फलंदाजाचे पाचव्या क्रमांकाचे वेगवान शतक केले. या स्पर्धेत सेहवाग (८१ - वि. बर्म्युडा) आघाडीवर
  • रोहितच्या विश्वकरंडक स्पर्धेत सलग तिसऱ्या डावात पन्नासपेक्षा जास्त धावा. भारतीय फलंदाजात सचिन, सिद्धू आघाडीवर
  • रोहितने पाकविरुद्धचे भारतीयांचे  तिसरे वेगवान शतक केले. यापूर्वी सेहवाग ८० (२००८) आणि ८४ (२००५) चेंडूत
  • विश्वकरंडकातील भारत-पाक लढतीत नाणेफेक जिंकलेल्या कर्णधाराचे प्रथमच क्षेत्ररक्षण

संक्षिप्त धावफलक
भारत - ५ बाद ३३६ (रोहित शर्मा १४० -११३ चेंडूत १४ चौकार व ३ षटकार, लोकेश राहुल ५७ - ७८ चेंडूत ३ चौकार, व २ षटकार, कोहली ७७ - ६५ चेंडूत ७ चौकार, पंड्या २६, विजय शंकर नाबाद १५, महंमद अमीर १०-१-४७-३, हसन अली ९-०-८४-१, वहाब रियाझ १०-०-७१-१.
पाकिस्तान
(लक्ष्य ४० षटकात ३०२)  - ४० षटकात ६ बाद २१२ (इमाम ऊल हक ७, फखार झमान ६२ - ७५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार, बाबर आझम ४८ - ५७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार, सर्फराज अहमद १२ - ३० चेंडू, इमाद वासीम नाबाद ४६ - ३८ चेंडूत ६ चौकार, शादाब खान नाबाद २० - १४ चेंडूत १ चौकार, भुवनेश्वर २.४-०-८-०, जसप्रीत बुमरा ८-०-५२-०, विजय शंकर ५.२-०-२२-२, हार्दिक पंड्या ८-०-४४-२, कुलदीप यादव ९-१-३२-२, यजुवेंद्र चाहल ७-०-५३-०)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News