विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • धोनीच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह 
  • कोहलीच्या नेतृत्वाविषयीसुद्धा होणार चर्चा? 

मुंबई : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीस अजून मुहूर्त सापडण्याची चिन्हे नाहीत. आधी प्रशासक समितीने लादलेल्या बंधनामुळे आजची बैठकी उद्यावर ढकलली गेली. पण, आता संघ निवडीच्या आड येणाऱ्या काही तांत्रिक प्रश्‍नांमुळे उद्या अपेक्षित असणारी बैठक रविवारी होईल. 

न्यायालयात एखाद्या केसमध्ये होणाऱ्या ‘तारीख पे तारीख’ असा हा खेळ सुरू आहे. निवड समिती विविध मुद्दे पुढे आणून आजची चर्चा उद्यावर ढकलत आहे. आता उद्या शनिवारी होणारी संघ निवड रविवारी होईल असे सांगण्यात येत आहे. अर्थात, याला अजूनही कुणाचाही दुजोरा नाही. बैठकीसाठी कर्णधारांची विभागणी, तंदुरुस्ती अहवाल, धोनीची निवृत्ती? असे काही तांत्रिक प्रश्‍नांची अडचण येत असल्याचे समजते.

धोनी पहिली पसंती नसेल
विंडीज दौऱ्यासाठी संघ निवडताना धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोरात सुरू आहे. संघ निवडताना धोनीला पहिली पसंती नसेल यात शंकाच नाही, पण तो संघात नसावा असेही फारसे कुणाला पटत नसल्याचे समजते. धोनीसाठी पर्याय तयार करताना युवा यष्टिरक्षकाला संघात स्थान देताना धोनीची संघात उपस्थिती असावी, असे अनेकांना वाटत आहे. 

कर्णधारांची विभागणी
भारतात कर्णधारांची विभागणी कठिण मानली जात आहे. यापूर्वी अनिल कुंबळेला कसोटी आणि धोनीला एकदिवसीय, तर मध्यंतरी धोनीला एकदिवसीय आणि कोहलीला कसोटी कर्णधार करण्यात आले होते. या दोन्ही प्रसंगाचा विचार केला, तर सुरवातीला कुंबळे एकदिवसीय क्रिकेट खेळत नव्हता, तर दुसऱ्या वेळी धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्याच्या स्थितीत कोहलीला पर्याय रोहित शर्मा आहे.विशेष म्हणजे दोघेही एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत आहेत. 

तंदुरुस्ती अहवाल
विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या संघातील खेळाडूंचा तंदुरुस्ती अहवाल  तयार नसल्यामुळे संघनिवड लांबणीवर पडली होती असे सांगितले जात आहे. क्रिकेट प्रशासन समिती प्रत्येक संघनिवडीपूर्वी असा अहवाल सादर करते. हा अहवाल उद्या शनिवारी सकाळपर्यंत मिळणार असून त्याआधारे संघनिवड होणार आहे. निवड समितीची बैठक रविवारी होईल, असे बीसीसीआयने शुक्रवारी ईमेलद्वारे स्पष्ट केले. 

कोहलीच्या उपलब्धतेबाबतही संभ्रम
संघनिवडीच्या बैठकीपूर्वी कर्णधाराला संघनिवड बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवणेही बंधनकारक आहे. मात्र त्याबाबत कोहलीने क्रिकेट प्रशासन समितीस याबाबत काहीही कळवले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रश्‍नावरूनही कोंडी झाली आहे. कोहलीने वेस्ट इंडीजच्या संपूर्ण दौऱ्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे कळवले असले तरी  त्याच्या बैठकीतील सहभागाबाबतचा संभ्रम कायम आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News