नवी दिल्लीतले डॉक्टर संपावर, पेशंट खाटेवर, रुग्णसेवा बेजार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

 कोलकात्यामधील कनिष्ठ डॉक्‍टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक परिषदेने (आयएएम) आज देशव्यापी संप केला.

नवी दिल्ली -  कोलकात्यामधील कनिष्ठ डॉक्‍टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक परिषदेने (आयएएम) आज देशव्यापी संप केला. त्यात सुमारे पाच लाख डॉक्‍टर सहभागी झाल्याने सरकारी, बिगरसरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील आरोग्य सेवा विस्कळित झाली.

देशातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी (ता. १८) सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज घेतला. न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्या. सूर्यकांत यांच्या सुटीतील खंडपीठाने डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भात उद्या सुनावणी घेण्यास मान्यता दिली. 

गेल्या आठवड्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी कनिष्ठ डॉक्‍टरांना बेदम मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टर गेल्या सात दिवसांपासून संपावर गेले होते आज संध्याकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेतला. मारहाणीविरोधात शुक्रवारी (ता. १४) डॉक्‍टरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, अशी मागणीही याचिकादारांनी केंद्रीय व राज्याच्या गृह व आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

 मारहाणीचा निषेध म्हणून ‘आयएमए’ने आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने देशभरातील डॉक्‍टरांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. यात ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’नेही (एम्स) सहभाग घेतला. यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले.  ‘आयएमए’च्या आवाहनानुसार लाखो डॉक्‍टरांनी देशपातळीवरील संपात भाग घेतला. अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले, तर प. बंगालमधील १०० पेक्षा वरिष्ठ डॉक्‍टरांनी सरकारी पदांचा 
राजीनामा दिला. 

देशभरातील स्थिती
उत्तर प्रदेश - राजधानी लखनौमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त डॉक्‍टर संपावर होते, यामुळे आरोग्य सेवा ठप्प झाली होती. आपत्‌कालीन व ट्रॉमा सेवा सुरू ठेवण्यात आली होती; मात्र ‘ओपीडी’ आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या.

पंजाब -  अमृतसरमध्ये रुग्णालये खासगी बाउन्सरसह खासगी सुरक्षा यंत्रणा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार करीत आहे. डॉक्‍टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणीही करण्यात आली.

केरळ  - सरकारी व खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी संपात भाग घेतला. खासगी डॉक्‍टरांनी आपत्कालीन सेवा उपलब्ध केली होती. मात्र सरकारी डॉक्‍टरांनी सर्व बाह्य रुग्ण सेवा फक्त सकाळी ८ ते १० ठेवली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकही सकाळी एक तास संपावर गेले होते.

राजस्थान -  रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी वेगळे सुरक्षा दल तयार करण्याची मागणी जयपूरमधील डॉक्‍टरांनी केली.

गुजरात, झारखंड, गोवा, तेलंगण, कर्नाटक, हरियाना, ओडिशा, आसाम व अन्य राज्यांमध्येही डॉक्‍टरांनी काम बंद ठेवले होते. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, मोर्चे काढण्यात आले.

डॉक्‍टरांचा संप मागे
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी त्यांचा आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतला. चर्चेदरम्यान डॉक्‍टरांनी त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला; त्यावर लगेच कृती करण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

दिल्लीतही हल्ला
‘एम्स’च्या ट्रॉमा केंद्रात एका कनिष्ठ डॉक्‍टरांवर आज सकाळी हल्ला करण्यात आला. यानंतर दुपारपासून अत्यावश्‍यक नसलेली सर्व आरोग्य सेवा बंद ठेवण्यात आली. गंभीर आजारी रुग्णावर उपचार करताना कनिष्ठ डॉक्‍टरांवर हा कथित हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News