भारत पुन्हा इतिहास घडवणार? फक्त दोन पाऊले बाकी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 7 July 2019

एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया... फलंदाजीत अव्वल असलेला विराट कोहली आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला जसप्रीत बुमरा, असा त्रिवेणी संगम असलेला भारतीय संघ विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार याचे भाकीत ठामपणे केले जात होते आणि ते खरेही ठरले आहे.

एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया... फलंदाजीत अव्वल असलेला विराट कोहली आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला जसप्रीत बुमरा, असा त्रिवेणी संगम असलेला भारतीय संघ विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार याचे भाकीत ठामपणे केले जात होते आणि ते खरेही ठरले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा गतिरोधक मध्ये आला, हा अपवाद वगळता आणि न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेल्या सामना वगळता, भारतीय संघाची विजयी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली. अशा स्पर्धेचा खरा टप्पा बाद फेरीपासून सुरू होतो व तो पुढील आठवड्यात होणार आहे. एका नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे, किंबहुना सरावाद्वारे आखण्यात आलेल्या विश्‍वकरंडकाच्या मोहिमेला आता सुवर्णमुलामा देण्याची घटिका जवळ आली आहे. दोन पावलांचा उंबरठा पार करायचा आहे की बस्स !!! पुन्हा चॅम्पियन !!! 

...पण कधी कधी हीच दोन पावले अतिशय सावधपणे टाकायची असतात. अगोदरचे अंतर कितीही वेगात आणि जोमाने पार केले असेल, पण अशा निर्णायक टप्प्यावर आल्यावर खरी कसोटी लागते. विश्‍वकरंडकाच्या इतिहासात या अगोदर आपण सहा वेळा या टप्प्यावर आलो, दोनदा यशस्वी ठरलो व चार वेळी रिकाम्या हाती परत आलो. प्रत्येक वेळी संघ वेगळा, प्रतिस्पर्धी वेगवेगळे आणि आव्हानेही वेगवेगळी. त्यामुळे तुलना करणे योग्य नाही. वर्तमान आणि वस्तुस्थितीच नवा इतिहास घडवत असते. शेवटी खेळामध्ये एक वास्तव अधोरेखित झालेले आहे. आदल्या दिवशी तुम्ही कितीही महापराक्रम केला असले, तरी प्रत्येक दिवस नवा असतो. त्या दिवशी तुम्ही कसे व्यक्त होता, त्यावर तुमचे आणि संघाचे भवितव्य आधारलेले असते. हे त्रिवार सत्य असले, तरी अनुभव आणि आत्मविश्‍वास ही रथाची दोन चाके पुढचा मार्ग तयार करीत असतात. म्हणूनच अनुभव, आत्मविश्‍वास आणि साखळी सामन्यांतील बेरीज-वजाबाकी विजेतेपदाचा लौकिक ठरवणार आहे. याचाच आधार घेत टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेणे क्रमप्राप्त होते. 

कणखर मानसिकता 
लढाया जिंकत जिंकत मार्गक्रमण केल्यावर युद्ध जिंकण्यासाठी मानसिकता अतिशय कणखर असणे महत्त्वाचे असते. समोर प्रतिस्पर्धी कोण आहे, यापेक्षा आपली क्षमता काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करायचा ही मानसिकता पक्की होते, तेव्हा उपांत्य फेरीत इंग्लंड असो वा ऑस्ट्रेलिया, फरक पडत नाही. आम्ही प्रतिस्पर्ध्यांचा विचार करत नाही, आम्ही जे करू शकतो त्याचा अधिक विचार करून खेळ करतो, असे विराट कोहली वारंवार सांगतो. भारतीय संघाची बदललेली ही मानसिकता आणि आव्हानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मागील 2015च्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही विराट-शास्त्री ही जोडी होती, सोबत संघव्यवस्थापनही तेच होते. तेव्हा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालो होतो. आताही विराट-शास्त्री आणि त्यांच्या संघव्यवस्थापनाची तीच टीम आहे, बदल झाला आहे तो विचारात. 

फॉरमॅटचा फायदा 
यंदाच्या स्पर्धेसाठी 1992चा फॉरमॅट वापरण्यात आला, म्हणजेच प्रत्येक संघाने प्रत्येकाशी खेळण्याचा. याचा फायदा अर्थातच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी होणार आहे. कारण साखळीतील लढतीचा अनुभव या निर्णायक सामन्यात होईल. भारताच्या बाजूने विचार केल्यास इंग्लंडकडून हार झाली आहे, तर ऑस्ट्रेलियाला हरवलेले आहे. त्यामुळे कमकुवत बाजूंवर मात करण्याची संधी आहे. 

आता भारतीय संघाने साखळी सामन्यात काय केले आणि पुढच्या निर्णायक सामन्यात काय सुधारणा करणे आवश्‍यक असेल, याचा विचार करू... 

रोहित शर्मावर मदार 
रोहित शर्माने शतक झळकावले, त्या सामन्यात भारताने तीनशे धावा केल्या आहेत. (अपवाद ऑस्ट्रेलिया सामन्याचा, पण त्यात त्याने अर्धशतक केले होते). शिखर धवन संघात नसताना आता रोहितने जास्तीत जास्त षटके खेळपट्टीवर राहणे आवश्‍यकच आहे. के. एल. राहुलने अधिक जबाबदारीने आणि मोठी खेळीचे उद्दिष्ट ठेवून फलंदाजी करावी लागेल. रोहित आणि विराट या दोघांपैकी एकाने पूर्ण 50 षटकांपर्यंत खेळपट्टीवर उभे राहावेच लागेल. 

हार्दिक-रिषभ पंत निर्णायक 
विश्‍वकरंडक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली, तरी भारताचा मधल्या फळीचा प्रश्न सुटलेला नाही. आता रिषभ पंतमुळे बळकटी येऊ शकते. मुळात पंत आणि हार्दिक भलतेच आक्रमक फलंदाज आहेत, परंतु हार्दिकने ज्या तडफेने आयपीएल गाजविली तेवढा विश्‍वास त्याला विश्‍वकरंडकामध्ये दाखवता आलेला नाही. आता हीच वेळ त्याला हिरो बनण्याची! केवळ अतिआक्रमकतेला आळा घालून विचाराने खेळ करावा लागेल. सोबत बहुचर्चित महेंद्रसिंग धोनीची बॅट तळपणे गरजेचे आहे, कारण पुढील चार जण हे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून फलंदाजीची अपेक्षा फारच कमी आहे. 

गोलंदाजी योग्य दिशेने 
जसप्रीत बुमरा बह्मास्त्र असलेली भारतीय गोलंदाज योग्य दिशेने आक्रमण करत आहे. आठ सामन्यांत केवळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना आपल्याविरुद्ध तीनशे धावा करता आलेल्या आहेत. विजेतेपदासाठी या दोन संघांचा सामना करावा लागणार आहे, त्यासाठी आणखी अचूकता आणि भेदकता आणावी लागेल. प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण यजुवेंद्र चहल-कुलदीप यादव या दोघांनी इंग्लंडविरुद्ध 20 षटकांत 160 धावा दिल्या होत्या. 

मैदानाच्या आकारानुसार डावपेच हवेत 
इंग्लंडमध्ये लहरी हवामानाचे नेहमीच आव्हान असते, मध्येच ढगाळ किंवा पावसाळी हवामान तयार झाल्यास वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व सुरू होते. यंदा खेळपट्ट्या फलंदाजांसाठी पोषक तयार करण्यात आल्या आहेत व हवामानही स्वच्छ आहे. मात्र, मैदानाच्या विचित्र आकारामुळे गोलंदाजांना सावध राहावे लागते. काही ठिकाणी एका बाजूची सीमारेषा 80 ते 90 मीटर, तर दुसऱ्या बाजूची 60 ते 70 मीटरची आहे. एजबस्टनचे मैदान असे प्रामुख्याने आहे आणि त्याचा अचूक फायदा इंग्लंड फलंदाजांनी भारताविरुद्ध घेतला होता. भारतीय गोलंदाजांना त्यानुसार टप्प्यातही बदल करावा लागेल. 

लॉर्डसवर भारताचा थेट अंतिम सामना? 
लॉर्डसचे मैदान ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. या मैदानावर विश्‍वकरंडकाचे काही सामने झाले, अगदी पाकिस्तान-बांगलादेश यांचाही सामना या मैदानावर खेळवण्यात आला. मात्र, भारताचा एकही साखळी सामना या मैदानावर झाला नाही. विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना याच मैदानावर होणार आहे. या मैदानावर खेळण्याचा आमचा हक्क अंतिम फेरी गाठण्याच्या कर्तृत्वानेच सिद्ध करू, अशी जिद्द भारतीयांना पुढील सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्यास निश्‍चितच प्रेरणादायी ठरू शकते. 

भारताचा उपांत्य फेरीचा इतिहास 
1983 : इंग्लंडवर विजय आणि वेस्ट इंडीजला हरवून विजेते 
1987 : इंग्लंडकडून पराभूत 
1996 : श्रीलंकेकडून पराभूत 
2003 : केनियावर विजय, अंतिम सामन्यात हार 
2011 : पाकिस्तानवर विजय आणि विजेते 
2015 : ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News