तरुणाईला "या" देशात अनेक संधी उपलब्ध

पूजा फुलंब्रीकर- धारवकर
Saturday, 17 August 2019

अन्य देशांच्या तुलनेत भारतात दरवर्षी सर्वात जास्त इंजिनिअर तयार होत असतात. स्वीडनमधील उद्योगपतींची नजर आता यादृष्टीने भारताकडे वळली आहे.

भारताविषयी जगभरात कुतूहल, आस्था आहे, हे आपल्या सगळ्यांप्रमाणेच मीही ऐकून होते. पण म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न काही वेळा मनात येत असे. एरव्ही परदेशात गेल्यानंतर याविषयी थोडेफार कळते; पण स्पष्ट कल्पना येतेच असे नाही. आनंदाची गोष्ट अशी, की त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याची संधी मला मिळाली. ती संधी म्हणजे स्वीडनमधील भारतीय दूतावासात काम करण्याची. हा अनुभव आपल्याकडच्या युवकांशी शेअर करावासा वाटला म्हणून हा लेखप्रपंच. गरीब आणि मागासलेला देश अशी एकेकाळी भारताची जगात प्रतिमा होती, याचं आता आश्‍चर्य वाटावं, असं वातावरण मला अनुभवायला मिळालं.

भारतातील मनुष्यबळाविषयीची प्रतिमाही खूप चांगली असल्याचं मला आढळलं. अन्य देशांच्या तुलनेत भारतात दरवर्षी सर्वात जास्त इंजिनिअर तयार होत असतात. स्वीडनमधील उद्योगपतींची नजर आता यादृष्टीने भारताकडे वळली आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेला आपला देश व्यापक संधी असलेला देश म्हणून गणला जाऊ लागला आहे. बहुतांश प्रमुख स्वीडिश कंपन्यांच्या शाखा भारतात आहेत, ही बाब भारतातील अमाप संधी अधोरेखित करते. याशिवाय तेथील लोकांना सर्वात जास्त आकर्षण योगाभ्यास व बॉलिवूडचे आहे.

योगाविषयीची त्यांची उत्सुकता केवळ ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’साजरी करण्यापुरती नाही. तो उपक्रम तर मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातोच; आणि अनिवासी भारतीयांपेक्षा स्वीडिश नागरिकांचा उत्साह त्या दिवशी ओसंडून वाहात असतो, हे मी प्रत्यक्ष पाहिलेय. पण अशा एखाद्या उपक्रमानं त्यांचं समाधान होतं, असं नाही. अनेक जण योगाचं सखोल शिक्षण घेण्यासाठी भारताची वाट धरतात. योगविचार, त्याचा इतिहास याविषयी त्यांना जिज्ञासा आहे.

स्वीडन हा आकारमानानं महाराष्ट्राएवढा आणि जेमतेम एक कोटी लोकसंख्येचा उत्तर युरोपातील देश. या देशाचा समावेश दरडोई उत्पन्नामध्ये जगात पहिल्या दहा देशांमध्ये आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आणि औद्योगिक आघाडीवर प्रगत असलेल्या स्वीडनमध्ये पुरुष-स्त्री, धर्म-जात असा कोणताही भेद मानला जात नाही. प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा आहे, असे ते मानतात. समाजातील त्यांची वागणूकही तशीच आहे. 

ते अतिशय नम्रपणे बोलतात. अवाजवी स्तुती केलेली त्यांना आवडत नाही.  मातृभाषा स्वीडिश असली, तरी ८६ टक्के लोकांना इंग्रजी येते. शाळांमध्ये इंग्रजी शिकविले जाते. जर्मन, फ्रेंच या भाषाही इथं बोलल्या जातात; पण नोकरी करायची असेल तर मात्र स्वीडिश भाषा शिकावी लागते. अशा या बहुढंगी, बहुरंगी देशातील भारतीय दूतावासात काम करणं हा वेगळाच अनुभव आहे. त्यात सर्वात जास्त काम व्हिसा डिपार्टमेंटला असते. गेल्या तीन-चार वर्षांत स्वीडनमधून भारतात जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे.

पर्यटनासाठी भारतातून केले जाणारे प्रयत्न, भारताची जगात वाढलेली प्रतिष्ठा, भारतातील उद्योगधंदे, योगाभ्यास, भारतीय नृत्य व कला यामुळे भारतात जाण्याकडे स्वीडिश लोकांचा कल वाढला आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील विविध उत्सव व सणांचं प्रतिबिंब परदेशातही पडत असते. भारतीय दूतावासाच्या व इतर मंडळांच्या मदतीनं येथे गणेशोत्सव, नवरात्र, होळी, दिवाळी, ईद असे सण उत्साहात साजरे होतात. राजकीय नेत्यांच्या भेटी हा एक मोठा इव्हेंट असतो. सुमारे २५ वर्षांनंतर या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट या दूतावासात काम करणाऱ्या आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. 

समानतेच्या बाबतीत जगभरात ओळख असलेल्या या देशात भारतीय युवकही शिक्षण व करिअरसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे स्वीडन हा भारतीयांच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत महत्त्वाचे आकर्षण बनला आहे. ‘आयटी’च्या विस्तारामुळे, उच्च शिक्षणासाठी, तसेच जागतिकीकरणामुळे आजकाल घरटी एखादा तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात असते.

त्यासाठी अन्य देशांबरोबरच आता स्वीडनच्या नावाचा विचार अनेक भारतीय करताना दिसतात. येथील सामाजिक शांतता, लिंगभावविषयक समानता, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा, उत्तम वैद्यकीय सुविधा ही स्वीडनची वैशिष्ट्येही आपल्याला पदोपदी जाणवतात आणि आपल्यालाही त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, याची जाणीव होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News