सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत-चीनचे प्रयत्न, राजनाथसिंह यांनी केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

"भारत-चीन सरहद्दीवर नेहमीच शांतता राहिली आहे. परंतु कधी कधी स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होतो. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा अभाव असल्यामुळे असे प्रकार घडतात"

- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

नवी दिल्ली : ‘सरहद्दीवरील शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणासाठी भारत आणि चीन आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करत आहेत. सोबतच देशाच्या सुरक्षेसाठी सरकार पूर्णपणे जागरूक आहे,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये तणाव नसल्याचा खुलासा आज लोकसभेत केला. 

अलीकडेच लडाख भागात चिनी सैनिकांची घुसखोरी उघडकीस आल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करताना सरकार चिनी घुसखोरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्ला चढवला होता. त्यावर उत्तर देताना राजनाथसिंह यांनी भारत-चीन संबंधांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, की भारत-चीन सरहद्दीवर नेहमीच शांतता राहिली आहे. परंतु कधी कधी स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होतो. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा अभाव असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. २०१७ मध्ये डोकलाममध्ये तणाव उद्‌भवला असताना दोन्ही देशांनी संयम पाळला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची वुहानमध्ये अनौपचारिक शिखर बैठक होऊन त्यात सरहद्दीवर शांतता आणि स्थैर्य राखण्याचे ठरले. दोन्ही सैन्यदलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे, जेणे करून शांतता राहावी आणि सरहद्दीवरील व्यवस्थापन चांगले राहावे. 

देश पूर्णपणे सुरक्षित आहे, असे सांगताना राजनाथसिंह यांनी चिनी सरहद्दीवर रस्ते, भुयारी मार्ग, धावपट्ट्या उभारणे यांसारख्या पायाभूत सोयी-सुविधांचे कामकाज वेगाने सुरू असल्याचेही सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News