कार्यकर्त्यांचा वधारला भाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 October 2019
  • शक्तिप्रदर्शन करीत मतदारांच्या भेठीगाठी घेण्यावर अधिक भर देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे.

लोहाराता - विधानासभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रचाराला अल्प कालावधी असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. शक्तिप्रदर्शन करीत मतदारांच्या भेठीगाठी घेण्यावर अधिक भर देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. उमरगा-लोहारा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांसह अपक्ष व अन्य पक्षांकडून अकराजण आपले नशीब आजमावत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रचारासाठी अल्प कालावधी दिला आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढून त्यांना प्रचारात सक्रिय करून संपूर्ण मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांची मात्र दमछाक होताना दिसत आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन मतदारांपुढे शक्तिप्रदर्शन करून आपल्याला मोठा जनाधार असल्याची वातावरणनिर्मिती करावी लागते. यासाठी सोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा असणे महत्त्वाचे असते.

प्रचारफेरीसाठी येणाऱ्या गरीब कुटुंबातील महिला आणि तरुणवर्गातील कार्यकर्त्यांना दोनवेळच्या जेवणासह चिरीमिरी द्यावी लागत आहे. यात आणखी एक वर्ग आहे. तो म्हणजे त्या-त्या गाव व परिसरातील वजनदार कार्यकर्ता. हा वजनदार कार्यकर्ता मोठी अर्थनीती वापरतो. शिवाय त्याला प्रचारासाठी स्वतंत्र वाहनाचीही सोय करावी लागते. रोजंदारीवर प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दररोज पैसे द्यावे लागतात; परंतु आचारसंहितेच्या बडग्यामुळे रोज ठरलेली रक्कम देण्यास उमेदवारांना अडचणी येत आहेत. आता प्रचाराने वेग घेतला आहे.

प्रचारासाठी केवळ आठच दिवस उरले असल्याने उमेदवार पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे उमेदवारांना उसंत मिळेनाशी झाली आहे. अशा स्थितीत उमेदवारांना कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. ही नस ओळखून रोजंदारीवर येणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपली रक्कम वाढवून मागण्यास सुरवात केली असल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News